For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धयोग्याचे मन पारदर्शक असल्याने त्याला मागील जन्म आठवतात

06:40 AM Jan 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिद्धयोग्याचे मन पारदर्शक असल्याने  त्याला मागील जन्म आठवतात
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

भगवंत म्हणाले, अर्जुना हा कर्मयोग म्हणजे माझ्या हृदयातील विशेष ठेवा आहे पण तू माझा जवळचा मित्र आणि भक्त असल्यामुळे तुला तो सांगितल्यावाचून मला राहवले नाही. काही काळ हा युद्धाचा प्रसंग आपण बाजूला ठेवूयात. तू स्वत:ला कर्ता समजू लागला आहेस, हे तुझे अज्ञान घालवून तुला आत्मस्वरुपाची जाणीव करून देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. ते पार पाडल्यावर आपण युद्धाकडे वळू. ह्यावरून लक्षात येते की, काळाला थोपवण्याची ताकद भगवंताकडे होती.

त्यावर अर्जुनाने विचारले, देवा! आपल्या दोघांचा जन्म हा अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा आहे मग तू सुरुवातीला हा योग त्याला सांगितलास, ह्यावर मी कसा विश्वास ठेवू? ह्या अर्थाचा त्या काळचा तुझा जन्म सूर्या चां तो पुरातन । तू बोलिलास आरंभी हे मी जाणू कसे बरे ।।4।।

Advertisement

हा श्लोक आपण पहात आहोत. श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुनाने भगवंतांना विचारले, हे कृपानिधी श्रीहरी! आई आपल्या मुलावर प्रेम करते, यात नवल ते काय? तू तर संसारतापाने दमलेल्या जीवांची सावली आहेस, अनाथ जीवांची आई आहेस आणि खरोखर तुझ्या कृपेच्या वर्षावानेच आमचा जन्म झाला आहे. देवा! आता तुला मी एक शंका विचारणार आहे पण त्याबद्दल तू राग मानू नकोस. हे अनंता! पूर्वीची गोष्ट म्हणून जी तू मला सांगितलीस, ती काही माझ्या मनाला पटली नाही. पाहा, विवस्वान म्हणजे कोण, याची माहिती आपल्या वाडवडिलांनासुद्धा नाही आणि तू म्हणतोयस तू त्याला उपदेश केलास, हे कसे बरे शक्य आहे.

विवस्वान ह्या शब्दाला सूर्य, रवि, भास्कर, अर्क, तेजस्वी, आदित्य असे अनेक समानार्थी शब्द आहेत. सूर्य हा वैस्वत मनुच पुत्र असल्याने त्याला विवस्वान असे म्हणतात. अर्जुन पुढे म्हणाला, सूर्य तर फार प्राचीन काळातला आहे, असे आम्ही ऐकतो आणि कृष्णा आपण तर अलीकडच्या काळात जन्माला आला आहोत. म्हणून तुझं बोलणं मला विसंगत वाटतंय. हे देवा! तुझे चरित्र आम्हास काही कळत नाही. तू जे बोलतोयस, ते एकदम खोटे आहे, असे तरी कसे म्हणावे? तेंव्हा तुझे बोलणे मला उत्तम प्रकारे समजू शकेल, अशा पद्धतीने सांग.

अर्जुनाच्या शंकेचे उत्तर देताना भगवंत पुढील श्लोकात म्हणाले, अर्जुना! ह्यापूर्वी माझे व तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत. त्या सर्वांना मी जाणतो. तू मात्र ते जाणत नाहीस.

माझे अनेक ह्यापूर्वी झाले जन्म तसे तुझे । जाणतो सगळे मी ते अर्जुना तू न जाणसी ।। 5 ।।

भगवंत अर्जुनाला म्हणाले, तुला पूर्वी होऊन गेलेले तुझे जन्म आठवत नाहीत पण मला मात्र आठवतात. भगवंताच्या ह्या सांगण्यावर विचार केल्यावर लक्षात येते की, योगेश्वर असलेले भगवंत हे निरपेक्षतेने कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात पूर्वीच्या वासना, इच्छा ह्या कशाकशाचे संस्कार राहिलेले नसल्याने त्यांचे मन स्वच्छ पाण्यासारखे पारदर्शक आहे. त्यामुळे त्यांना पूर्वीचे जन्म सहजी आठवत आहेत.

माणसांच्या मनात असलेल्या अनेक इच्छा अपुऱ्या राहून मृत्यू आल्याने त्यांना पुनर्जन्म मिळतो आणि त्यांचे संस्कार तसेच त्याच्या मनावर रहात असल्याने त्याला पूर्वीचे जन्म आठवतनाहीत. वरील श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, जेव्हा विवस्वान होता, त्याकाळी मी नव्हतो, असं तुला वाटतंय पण तुला हे माहित नाही की, माझे आणि तुझे आजपर्यंत पुष्कळ जन्म झाले आहेत. तुला आपल्या गतजन्माचे स्मरण नाही. पण ज्या ज्या वेळी जे जे रूप घेऊन मी अवतरलो, त्या सर्व अवतारांचे मला स्मरण आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.