For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

जगाच्या निर्मितीचा भास भगवंतांनी निर्माण केला असल्याने ते त्याचा आधार आहेत

06:30 AM Oct 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
जगाच्या निर्मितीचा भास भगवंतांनी निर्माण केला असल्याने ते त्याचा आधार आहेत
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

न वा भूते हि माझ्यात माझा हा दिव्य योग की । करितो धरितो भूते परी त्यात नसे कुठे ।। 5 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यातील कल्पना स्पष्ट करण्यासाठी माउली मृगजळाचे उदाहरण देतात. ते म्हणतात, सूर्यकिरणांमुळे मृगजळाचा भास होतो पण सूर्यकिरणात मृगजळ नसते त्याप्रमाणे प्राणी मात्र भगवंतांच्या ठिकाणी नसतात किंवा भगवंतही त्यांच्यात नसतात. ज्ञानी लोक हे पुरेपूर जाणून असतात. ज्याप्रमाणे मृगजळ खोटे असते त्याप्रमाणे प्राणिमात्रही खोटे आहेत पण त्याची निर्मिती करणारे सूर्यकिरण खरे असतात, त्याप्रमाणे समोर दिसणारे प्राणी हे खोटे पण भगवंत सत्य आहेत हे लक्षात घ्या. मृगजळाचा भास सूर्यकिरण निर्माण करत असल्याने ती किरणे हा जसा त्याचा आधार असतो त्याप्रमाणे जगाच्या निर्मितीचा भास भगवंतांनी निर्माण केला असल्याने ते त्याचा आधार आहेत.

एखादा चित्रकार जेव्हा एखादे चित्र काढतो तेव्हा त्यात अनेक गोष्टी दाखवतो आणि एक सुंदर देखावा आपल्या समोर आहे असा बघणाऱ्याच्या डोळ्यापुढे भास निर्माण होतो. चित्र त्या चित्रकाराने तयार केले असल्याने तो त्यात दिसत नसला तरी त्याचे अस्तित्व त्यात जाणवत असते, त्याची चित्र काढण्याची शैली त्यातून डोकावत असते त्याप्रमाणे भगवंतांनी निर्माण केलेल्या विश्वात ते नसले तरी ते त्यांनी तयार केले असल्याने त्यांचे अस्तित्व त्यात डोकावत असते. चित्रकाराला त्या चित्रात हवे तसे बदल करण्याचे किंवा ते चित्र संपूर्ण पुसून टाकण्याचे वा ते आहे तसे ठेवण्याचा अधिकार असतो, म्हणजेच त्या चित्राला केवळ त्याचाच आश्रय असतो तसेच परमेश्वराला जगाचे भवितव्य ठरवण्याचे पूर्ण अधिकार असतात म्हणून जगाला त्याचाच आश्रय असतो. जगाच्या निर्मितीचे, त्यात हवे तसे बदल करण्याचे वा ते संपूर्ण नष्ट करण्याचे सर्वाधिकार असणे हा भगवंतांचा ऐश्वर्ययोग होय.

Advertisement

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, हे सर्व विश्व, त्यातील प्राणी माझ्यापासून निर्माण झाले आहेत. ते माझे आश्रित असल्याने माझ्यावर अवलंबून आहेत, त्यांचे भवितव्य माझ्या हातात आहे म्हणून ते माझ्याहून वेगळे नाहीत. आकाशात महा-वायु सदा सर्वत्र राहतो । माझ्यात सगळी भूते राहती जाण तू तशी ।।6 ।। श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, सर्वत्र संचार करणारा वायु आकाशाचे ठिकाणी नित्य स्थित आहे, कारण तो आकाशाचा आश्रीत आहे त्याप्रमाणे सर्व भूते माझी आश्रित असल्याने ती माझ्या ठिकाणी स्थित आहेत. वायू आकाशाला धरून असल्याने त्यांची व्याप्ती आकाशाएव्हढी आहे. वायू जरी नजरेला दिसत नसला तरी पंखा हलवून पाहिले तर त्याचे अस्तित्व जाणवते अन्यथा आकाश व तो एकच असतात. त्याप्रमाणे प्राणिमात्र माझ्या ठिकाणी आहेत अशी कल्पना केली तर आहेत असे वाटते पण जर कल्पना केली नाही तर तसा भास न होता सर्वत्र मीच आहे असे वाटते. म्हणून प्राणिमात्राचा भास आहे आणि नाही हे कल्पना करण्यावर अवलंबून आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.