प्रामाणिक ग्राहकांनाही ‘सिम कार्ड ब्लॉक’चा ताप
दूरसंचार कंपन्यांच्या कारवाईने नाराजी : सायबर घोटाळे रोखण्याच्या उद्देशाने अंमलबजावणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या निर्देशांनंतर खासगी दूरसंचार कंपन्यांनी संशयाच्या भोवऱ्यातील सिमकार्ड बंद करण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. या निर्णयाचा फटका प्रामाणिक ग्राहकांना बसत असल्याच्या अनेक घटना ठिकठिकाणी दिसून येत आहेत. सायबर गुन्हे आणि ऑनलाईन फसवणुकीसारखे प्रकार रोखण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला असला तरी काही विद्यार्थी, गृहिणी यांनाही याचा फटका बसल्याने अनेक ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत. दहा-पंधरा वर्षांपासून किंवा त्यापेक्षाही अधिक कालावधीपासून वापरात असलेले सिमकार्ड अचानक ब्लॉक केले जात असल्याने संपर्क साधणे, बँकिंग व्यवहार, शैक्षणिक सुविधा अशा विविध कामांमध्ये अडथळे येत आहेत.
केंद्रीय दूरसंचार विभागाने काही दिवसांपूर्वी जिओ, एअरटेल आणि व्हीआय सारख्या दूरसंचार कंपन्यांना 28,220 मोबाईल बँड बंद करण्याचे निर्देश दिले होते. याशिवाय सुमारे 20 लाख मोबाईल कनेक्शनची फेरतपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मोबाईल हँडसेटच्या माध्यमातून होणारी ऑनलाईन फसवणूक हे त्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले होते. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून या निर्णयाचा फटका काही प्रामाणिक ग्राहकांनाही बसत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता कंपन्यांकडून सिमकार्ड बंद करण्यात येत आहेत. यासंबंधी दूरसंचार कंपन्यांकडे विचारणा केली असता ग्राहकासंबंधी कोणतीही माहिती किंवा सत्यापन कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. मात्र, गेली कित्येक वर्षे रिचार्ज करून योग्यपणे वापरात असलेली सिम कार्ड अचानक बंद होत असल्याने प्रामाणिक ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. आता केवायसी अपडेट करण्याची किंवा फोटो, ओळखपत्राचे पुरावे सादर करण्याची सूचना कंपन्या करत आहेत. तथापि, सिमकार्ड खरेदी करताना किंवा ते पोर्ट करताना सर्व कागदपत्रे सादर केलेली असतानाही आता पुन्हा दूरसंचार कंपन्यांकडून वेगवेगळी कारणे पुढे केली जात असल्याने ग्राहकांमध्ये संताप पसरलेला दिसून येत आहे.
फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
देशात मोबाईलच्या माध्यमातून होणारे सायबर गुन्हे वेगाने वाढत आहेत. 2023 मध्ये डिजिटल आर्थिक फसवणुकीमुळे सुमारे 10,319 कोटी ऊपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी 6 लाख 94 हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. या घटनांमध्ये वेगवेगळ्या प्रदेशातील सिमचा वापर फसवणुकीसाठी केल्याचे उघड झाल्यानंतर केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने सिमकार्ड वापरासाठीचे नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला होता.