महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नीरज चोप्राचा रौप्यवेध

06:56 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 89.45 मी भाला फेक : पंतप्रधान मोदी यांच्यासह देशवासियांकडून कौतुकाचा वर्षाव

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

भारताचा दिग्गज भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने हंगामातील सर्वोत्तम 89.45 स्कोअर केला व मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली. त्याचे बाकीचे थ्रो फाऊल होते. या कामगिरीसह ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दुसरे पदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर भालाफेकसह सुवर्णपदक जिंकले. अर्शदने 6 पैकी 2 थ्रो 90 पेक्षा जास्त फेकले. विशेष म्हणजे, नदीमने टाकलेला थ्रो ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात लांब थ्रो ठरला. ग्रेनेडाच्या पीटर्स अँडरसनने कांस्यपदक पटकावले.

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. यामुळे संपूर्ण भारतीयांच्या नजरा पॅरिस ऑलिम्पिककडे लागल्या होत्या. नीरजने पात्रता फेरीत 89.34 मीटर दूर भाला फेकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यामुळे भारतातील कोट्यावधी चाहत्यांच्या आशा नीरज चोप्राकडून होत्या. गुरुवारी रात्री भालाफेकची अंतिम फेरी पडली. नीरजच्या अंतिम फेरीची सुरुवात निराशाजनक झाली. नीरज समोर प्रमुख आव्हान असलेल्या अँडरसन पीटर्सने पहिल्या प्रयत्नात 85 मीटर पेक्षा कमी अंतरावर पहिला थ्रो टाकला. यानंतर पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला तर नीरजने पहिला थ्रो फाऊल टाकला.

 

नदीमचे ऑलिम्पिक रेकॉर्ड, नीरज दुसऱ्या स्थानी

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटर थ्रो टाकला. या कामगिरीसह अंतिम फेरीत नदीमने सर्वांना चकित केले. नीरजप्रमाणेच त्याचा पहिला प्रयत्नही फाऊला होता, मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने 92.97 मीटर भालाफेक करून ऑलिम्पिक विक्रम केला. त्याच्या आधी, भालाफेकचा ऑलिम्पिक विक्रम नॉर्वेच्या अँड्रियास थॉर्डकिलसेनच्या नावावर होता, ज्याने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 90.57 मीटर भालाफेक केली होती. नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर थ्रो टाकत दुसरे स्थान मिळवले. यानंतर नीरजला तिसऱ्या प्रयत्नात अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही व त्याचा फाऊल गेला. यानंतर नीरजचा चौथा, पाचवा व सहावा प्रयत्नही फाऊल गेला.

भारताचे प्रतिनिधित्व करत 2 ऑलिम्पिक पदके जिंकणारा नीरज केवळ चौथा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी सुशील कुमार, पीव्ही सिंधू आणि मनू भाकर यांनी प्रत्येकी 2 ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. यापूर्वी नीरजने 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

रौप्य जिंकल्याचा आनंदच, सुवर्ण हुकल्याचीही खंत

देशासाठी आपण जेव्हाही पदक जिंकतो, तेव्हा आनंद होतो. रौप्य पदक जिंकलो, याचा आनंद आहेच. मात्र, सुवर्णपदक हुकल्याचे दुख:ही कुठं तरी मनात आहे. पण आता स्वत:मध्ये सुधारणा करण्याची वेळ आहे. याबाबत टीम बरोबर बसून चर्चा करेन, अशी प्रतिक्रिया नीरजने दिली. अंतिम सामन्यात वारंवार झालेल्या फाऊलबाबत नीरज म्हणाला, ‘मी माझ्या कामगिरीवर खूश नाही आणि माझी टेक्निक आणि रनवेही चांगला नव्हता. फक्त एक थ्रो झाला, बाकीचे मी फाऊल केले. दुसऱ्या थ्रोमध्ये, मला विश्वास होता की मी सुद्धा एवढ्या लांब फेकू शकेन. पण भालाफेकमध्ये, जर तुमचा रनवे इतका चांगला नसेल तर भाला फार पुढे जाऊ शकणार नाही. अंतिम सामन्यादरम्यान तो दुखापतीने त्रस्त होता, हे सामन्यानंतर त्याने मान्य केले.

सुवर्ण जिंकणाराही माझाच लेक, नीरजच्या आईची मन जिंकणारी प्रतिक्रिया

नीरजने पुन्हा एकदा पदक जिंकल्यामुळे त्याची आई खूश आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. यावेळी नीरजच्या आई सरोज देवी म्हणाल्या की, आम्ही खूप आनंदी आहोत, आमच्यासाठी रौप्यपदकही सुवर्णपदकासारखेच आहे. काही हरकत नाही, ज्याने सुवर्णपदक घेतले तोही आमचा मुलगा आहे आणि त्यानेही मेहनत करून साध्य केले आहे, अशी पाकिस्तानच्या अर्शदविषयी मन जिंकणारी प्रतिक्रिया नीरजच्या आईंनी दिली. पुढे त्याला म्हणाल्या, प्रत्येक खेळाडूचा दिवस असतो. नीरज जखमी झाला होता, त्यामुळे त्याच्या कामगिरीवर आम्ही खूश आहोत. तो आल्यावर मी त्याचे आवडते पदार्थ बनवीन.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून कौतुक, नीरजला दिला मोलाचा सल्ला

नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकत सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याचा विक्रम केला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्याशी फोनवरून संवाद साधत या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. तब्बल चार मिनिटे मोदींनी नीरजशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्याच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आणि आता सुवर्णपदक विसरून जा, असे सांगत त्याची समजूत घातली. नीरजने त्याच्या दुखापतीबद्दल मोदींना माहिती दिली. दुखापत झाल्यामुळे भाला फेकताना जी ऊर्जा लावावी लागते, ती लावता आली नाही, असेही नीरजने सांगितले. यावर मोदींनी त्याची समजूत घालत आपण जेव्हा भेटू तेव्हा दुखापतीवर चर्चा करु, असे आश्वासन दिले.

भारताच्या पाच पदकावर पाकचे एक सुवर्ण भारी

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिकमधील बहुप्रतिक्षित ‘भालाफेक‘ स्पर्धेमध्ये भारताच्या नीरज चोप्रावर मात केली. अर्शदने 92.97 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. नीरजने 89.45 मीटर थ्रो करून भारताला रौप्यपदक मिळवून दिले. अर्थात, नदीमने जिंकलेले सुवर्ण पाकिस्तानसाठी खास ठरले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने जिंकलेल्या 5 पदकांपेक्षा पाकिस्तानच्या एका सुवर्णपदकाने बाजी मारली आहे. पदकतालिकेत आजच्या घडीला पाकिस्तान एका सुवर्णपदकासह 53 व्या स्थानी आहे. भारत 11 स्थानाने खाली म्हणजेच 5 पदकासह 64 व्या स्थानी आहे.

बांधकाम कामगाराचा मुलगा ते ऑलिम्पिक सुवर्ण, नदीमचा संघर्षमय प्रवास

अर्शद नदीमचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आले आहे. अर्शदचे वडील बांधकाम मजूर असून घरात वडीलच कमावते असल्यामुळे अर्शदला सुरुवातीपासून संघर्षात दिवस काढावे लागले आहेत. पण या संघर्षाच्या जोरावर पाकिस्तानच्या 6.3 फुटांची उंची असलेल्या या खेळाडूने आपल्या आयुष्यातील सर्व संघर्ष पणाला लावत भाला फेकला आणि 92.97 मीटरचा थ्रो करत यंदाच्या ऑलिम्पिकमधील सर्वोच्च विक्रम नोंदविला. याआधी ऑलिम्पिकमध्ये 90.57 मीटरचा विक्रम होता, तो अर्शदने मोडीत काढला. अर्शदचे वडील मोहम्मद अशरफ म्हणाले, बहुतेक लोकांना माहित नाही की अर्शद इथपर्यंत कसा पोहोचला. आमच्या गावातील लोकांनी आणि नातेवाईकांनी सुरुवातीला पैसे देऊन नदीमला प्रशिक्षण दिले. त्याच्या प्रवासाचा खर्चही उचलला. अर्शदने या संधीचे सोने करत पाकिस्तान क्रीडा मंत्रालयाचे नाव रोशन केले आहे.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article