For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उदितला रौप्य, अभिमन्यू, विकीला कास्यपदक

06:34 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
उदितला रौप्य  अभिमन्यू  विकीला कास्यपदक
Advertisement

वृत्तसंस्था/ बिशेक (किर्जीस्तान)

Advertisement

येथे सुरू असलेल्या वरिष्ठांच्या आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत भारताचा मल्ल उदितने रौप्यपदक पटकावले तर या स्पर्धेत भारताच्या अभिमन्यू आणि विकी यांनी आपल्या वजनगटातून कास्यपदके मिळवली. आकाश दाहीया आणि अनिरुद्ध कुमार यांनी पदक फेरीमध्ये प्रवेश केला आहे.

पुरुषांच्या 57 किलो वजनगटातील फ्रिस्टाईल प्रकारात जपानच्या केंटो युमियाने भारताच्या उदितचा 5-4 अशा गुणांनी निसटता पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. उदितला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या 70 किलो फ्रिस्टाईल गटात भारताचा मल्ल अभिमन्यूने उझ्बेकच्या बिजॉन कुलडेशेवचा 6-5 अशा गुणांनी पराभव करत कास्यपदक मिळवले. त्याचप्रमाणे पुरुषांच्या 97 किलो वजन गटातील फ्रिस्टाईल लढतीत भारताच्या विकीने किर्जीस्तानच्या आंद्रे अॅरोनोववर 10-1 अशी एकतर्फी मात करत कास्यपदक पटकावले. या स्पर्धेत शुक्रवारी भारताने तीन पदकांची कमाई केली. 65 किलो गटातील कास्यपदकासाठीच्या लढतीत जपानच्या ओनोने भारताच्या रोहित कुमारवर 5-3 अशी मात केली. रोहित कुमारने निवड चाचणीमध्ये भारताच्या बजरंग पुनियाला पराभूत केले होते. भारताच्या उदितचे वरिष्ठ पातळीवरील स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. त्याने यापूर्वी म्हणजे 2022 साली ट्युनेशियात झालेल्या मानांकन कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते.

Advertisement

भारताचे मल्ल आकाश दाहीया आणि अनिरुद्ध कुमार यांनी आपल्या वजन गटातून पदक फेरीमध्ये प्रवेश केला आहे. 61 किलो वजन गटात आकाश दाहीयाने उझ्बेकच्या रुझिमोववर 10-8 अशा गुणांनी मात केली. त्यानंतरच्या पुढील लढतीत आकाशने कोरियाच्या सनचा 7-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र, उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या एटीकेनने आकाश दाहीयाचा एकतर्फी पराभव केला. आता कास्यपदकासाठीच्या लढतीत आकाश दाहीयाची लढत मंगोलियाच्या इनेकबेटशी होणार आहे. त्याचप्रमाणे 125 किलो वजन गटात भारताच्या अनिरुद्ध कुमारने पहिल्या फेरीच्या लढतीत पाकिस्तानच्या झमान अन्वरचा 3-0 असा पराभव केला पण त्यानंतर त्याला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इराणच्या अमिर हुसेनकडून तांत्रिक गुणावर हार पत्करावी लागली. आता कास्यपदकाच्या लढतीत अनिरुद्ध कुमारची गाठ बहरीनच्या शमील शेरीपोव्हशी होणार आहे. या स्पर्धेत पुरुषांच्या फ्रिस्टाईल प्रकारातील लढतीचा शेवटचा दिवस असून शनिवारपासून महिलांच्या विभागातील लढतींना प्रारंभ होईल.

Advertisement

.