For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हार्दिक, अमिशा, प्राची यांना रौप्य

06:20 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
हार्दिक  अमिशा  प्राची यांना रौप्य
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताचे बॉक्सर हार्दिक पन्वर, अमिशा केरेटा व प्राची टोकास यांनी अर्मेनियातील येरेव्हन येथे सुरू असलेल्या आयबीए ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदके पटकावली. अंतिम फेरीत त्यांना प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव स्वीकारावा लागला.

आशियाई ज्युनियर चॅम्पियन हार्दिकला 80 किलो वजन गटाच्या चुरशीच्या अंतिम लढतीत रशियाच्या अशुरोव्ह बैरामखानकडून 2-3 असा निसटता पराभव स्वीकारावा लागल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दोघांनी या लढतीत आक्रमक खेळ करताना गुण मिळविण्याच्या संधीचा लाभ घेतला आणि प्रेक्षकांनाही रोमांचकतेचा अनुभव दिला. मात्र अखेरीस रशियन बॉक्सरने बाजी मारत सुवर्ण पटकावले.

Advertisement

महिलांच्या 54 किलो वजन गटात अमिशाला तसेच 80 किलोवरील गटात प्राचीला प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून 0-5 याच फरकाने हार पत्करावी लागली. अमिशाला कझाकच्या आयाझान सिडीकने तर प्राचीला उझ्बेकच्या आशियाई ज्युनियर चॅम्पियन सोबिराखोन शाखोबिद्दिनोव्हाने हरविले.

भारताने या स्पर्धेत एकूण 17 पदकांची कमाई केली. त्यात 5 कांस्यपदकांचा समावेश आहे. पायल (48 किलो), निशा (52 किलो), विनी (57 किलो), सृष्टी (63 किलो), आकांक्षा (70 किलो), मेघा (80 किलो), जतिन (54 किलो), साहिल (75 किलो), हेमंत (80 किलोवरील) यांनी सुवर्णपदकाच्या फेरीत प्रवेश मिळविला आहे. नेहा (46 किलो), निधी (66 किलो), परी (50 किलो), कृतिका (75 किलो), सिकंदर (48 किलो) उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने त्यांना कांस्यपदक मिळाले.

Advertisement
Tags :

.