Kolhapur : धनत्रयोदशीला चांदीच्या दरात मोठी घसरण ; 24 हजाराने उतरली
तीन दिवसांत चांदी 24 हजाराने स्वस्त
कोल्हापूर : गेल्या कांही दिवसापासून देशभरासह जगभरामध्ये सोने व चांदी दरात सतत बाढ सुरू आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चांदीचा दर २ लाख रूपये किलो होण्याचे संकेत होते. कारण चांदीचा दर दिवशी एक, दोन नव्हे तर १० हजार रूपयांनी वाढ सुरू होती. पण गेल्या तीन दिवसांत चांदी दरामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू आहे. १ लाख ९२ हजार रूपयांवरून शनिवारी धनत्रयोदशी १ लाख ६८ हजार रूपयांपर्यत चांदीचा दर घसरला आहे.
सोने-चांदी दरामध्ये दिवसेंदिवस वाढ सुरू आहे. सोने दीड लाख तर चांदी दोन लाख रूपये होणार, अशी चर्चा कोल्हापूर सराफबाजारात सुरू होती. सोमवारी १३ रोजी चांदीचा दर १ लाख ७७ हजार ८०० रूपये होता. पण मंगळवारी ७२०० रूपयांनी चांदी दर वाढून हाच दर १ लाख ८५ हजार रूपये असा झाला. बुधवारी पुन्हा एकदा ७००० रूपयांन वाढ होऊन, १ लाख ९२ हजार रूपये चांदी झाली.
गुरूवारनंतर मात्र पुन्हा एकदा चांदीच्या दराची घसरण सुरू झाली. गुरुवारी ७००० रूपयांनी तर शनिवारी १७००० रूपयांनी म्हणजेच २४ हजार रूपयांनी चांदी दरात घसरण झाली आहे. याचा फटका व्यापाऱ्याना, गुंतवणूकदारांना बसला आहे. मात्र सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ८०० रूपये असा स्थिर आहे.