For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताला कुस्ती, सेलिंगमध्ये रौप्य पदके

06:05 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताला कुस्ती  सेलिंगमध्ये रौप्य पदके
Advertisement

आशियाई क्रीडा स्पर्धा : स्क्वॅशमध्ये महिला, पुरुष संघांना कांस्य, वैयक्तिक कंपाऊंडमध्ये गणेश मणिरत्नमला कांस्य

Advertisement

वृत्तसंस्था/नागोया

आशियाई क्रीडा स्पर्धेतील गुरुवारी 12 व्या दिवशी भारताने दोन रौप्यपदकांची कमाई केली. केरळच्या प्रिन्स कृसिनिकल नोबेल आणि मनू फ्रान्सीस यांनी नौकानयन प्रकारात तर पुरुषांच्या कुस्ती प्रकारात भारतीय मल्ल नितेश सिवाचने रौप्यपदके मिळविली. पदकतक्त्यामध्ये भारताने 10 सुवर्ण, 22 रौप्य आणि 32 कांस्यपदकांसह एकूण 64 पदकांची कमाई करत पदकतक्त्यातील आघाडीच्या 10 देशांमध्ये आपले स्थान राखले आहे. पुरुष हॉकी आणि पुरुष क्रिकेट या दोन क्रीडा प्रकारात भारताने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. पुरुष आणि महिलांच्या सांघिक स्क्वॅश प्रकारात भारताने कांस्यपदके मिळविली.

Advertisement

नौकानयनमध्ये पहिले पदक

नौकानयन या क्रीडा प्रकारात भारतीय स्पर्धकांनी पहिल्यांदाच रौप्यपदकाची कमाई केली आहे. नौकानयनमधील स्किफ प्रकारात केरळच्या नोबेल आणि मनू फ्रान्सीस यांनी दुसऱ्या स्थानासह रौप्यपदक मिळविताना हाँगकाँगला मागे टाकले. या क्रीडा प्रकारात चीनने सुवर्णपदक पटकाविले. भारताने रेगाटा या प्रकारात 9 पैकी 3 शर्यती जिंकून दुसरे स्थान मिळविले. महिलांच्या सांघिक रेगाटा प्रकारात भारताच्या हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा यांनी कांस्यपदक पटकाविले.

नितीशला रौप्यपदक

पुरुषांच्या 97 किलो वजन गटातील ग्रिको रोमन कुस्ती प्रकारात अंतिम लढतीत जपानच्या युरी नाकाझाटोने भारताच्या नितीश सिवाचचा 4-0 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या पराभवामुळे नितीशला या क्रीडा प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

सांघिक स्क्वॅशमध्ये कांस्यपदके

पुरुष आणि महिलांच्या सांघिक स्क्वॅश प्रकारात भारताला दोन कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले. हाँगकाँग संघाकडून भारतीय महिला स्क्वॅश संघाला 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला. अनाहत सिंग, जोश्ना चिन्नप्पा, तन्वी खन्ना व शमिना रियाज यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. तर पुरुषांच्या सांघिक प्रकारामध्ये मलेशियाने भारताचा 2-1 असा पराभव केल्याने भारताला कांस्यपदक मिळाले. पुरूषांच्या वैयक्तिक तिरंदाजी कंपाऊंड प्रकारात भारताच्या गणेश मणीरत्नम थिरुमुरूने कांस्यपदक मिळविले. त्याने व्हिएतनामच्या डेंगचा 149-144 अशा गुणांनी पराभव केला. बुधवारी सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्या पुरुष संघामध्ये गणेशचा समावेश होता.

भारताचे पदक निश्चित

सेपकटकरॉ या क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष संघाने उपांत्य फेरीत म्यानमारचा 2-1 असा पराभव करून या क्रीडाप्रकारातील भारताचे किमान 1 पदक निश्चित केले आहे. अ गटातील झालेल्या लढतीमध्ये भारताने म्यानमारचा 10-15, 15-13, 15-7 असा पराभव केला. या गटातून भारतीय पुरुष संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखत आघाडीचे स्थान मिळविले आहे. पहिल्या लढतीत भारताने लाओसचा तर दुसऱ्या लढतीत व्हिएतनामचा पराभव केला. या क्रीडा प्रकारात इंडोनेशिया ब गटात आघाडीवर आहे.

टेनिसपटू प्रथमच पदकाविना

टेनिस या क्रीडा प्रकारात भारताला यावेळी पहिल्यांदाच पदकाविना रिकाम्या हाताने परतावे लागणार आहे. 1986 नंतर प्रथमच या क्रीडा प्रकारात भारताला एकही पदक मिळालेले नाही. पुरुष एकेरीमध्ये भारताच्या सुमित नागलचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. चीनच्या वू ने नागलचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. हा सामना 100 मिनिटे चालला होता. भारतीय नेमबाज पुरुषांच्या रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत अनीश भनवालाने सातवे स्थान मिळविल्याने त्याचे आव्हान समाप्त झाले. नेमबाजीत भारताने एकूण 15 पदके मिळविली. भारतीय ज्युडोपटू इनुनगम्बी ताखेलम्बम कांस्यपदकाच्या लढतीत पराभूत झाली तर कयाक एकेरी कॅनो स्लॅमम अंतिम फेरीत शिखा चौहानला सातवे स्थान मिळाले.

गोल्फमध्ये दोन पदकांच्या शर्यतीत

गोल्फ या क्रीडा प्रकारात भारताला दोन पदके मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. महिलांच्या विभागात भारताच्या प्रणवी अर्सने आपल्या कामगिरीत सातत्य राखत दुसऱ्या फेरीअखेर दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या प्रकारात सिंगापूरची तेन 64 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. महिलांच्या सांघिक प्रकारात भारतीय संघाला कांस्यपदक मिळण्याची अपेक्षा केली जात आहे.

Advertisement
Tags :

.