छत्रपती कला क्रिडा मंडळाचे कार्य कौतुकास्पद
अभिनेते अनिल गवस ; विलवडे छत्रपती मंडळाचा रौप्य महोत्सव साजरा
ओटवणे प्रतिनिधी
विलवडे येथील छत्रपती कला क्रिडा मंडळ रौप्य महोत्सव साजरा करीत आहे हे कौतुकास्पद असून या मंडळाने गावासह परिसराच्या शैक्षणिक, कला, क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रात दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते कथा वाफोली गावचे सुपुत्र अनिल गवस यांनी केले.विलवडे येथील छत्रपती कला क्रिडा मंडळाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात अभिनेते अनिल गवस बोलत होते. यावेळी शासकीय जिल्हास्तरीय साहित्यिक व कलावंत मानधन योजनेचे सदस्य मयूर गवळी, छत्रपती कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष विनायक दळवी, माजी सरपंच बाळकृष्ण दळवी, मोहन दळवी, रावजी दळवी, विलवडे छत्रपती शिवाजी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक सोनू दळवी, विठ्ठल दळवी, विलवडे शाळा नं १ मुख्याध्यापक मनोहर गवस, निवृत्त प्राध्यापक रमाकांत गावडे आदी उपस्थित होते.यावेळी मयूर गवळी यांनी कोकण ही कलाकारांची खाण असून पारंपारिक कलेची जोपासना केलेल्या या कलाकारांना वृद्धापकाळात आर्थिक सहकार्याची गरज असते. त्यामुळे अशा कलाकारांना जिल्हास्तरीय राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान योजनेतून सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी विनायक दळवी यांनी सामाजिक जाणवेतून मंडळ विविध उपक्रम राबवित असून यापुढेही विलवडे परिसराच्या उपक्रमासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमात अभिनेते अनिल गवस आणि मयूर गवळी यांचा छत्रपती कला क्रिडा मंडळाच्यावतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त प्रा रमाकांत गावडे यांनी केले.