ललितला रौप्य, सुनील कुमारला कांस्य
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
23 वर्षांखालील यू-23 आशियाई स्पर्धेचा माजी कांस्यपदक विजेता ललित याने मंगळवारी किर्गिस्तानमधील बिश्केक येथे सुरू असलेल्या 2026 च्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे पहिले पदक पटकाविले. 55 किलो वजनी गटातील ग्रिकोरोमन प्रकारात त्याने रौप्य पदकाची कमाई केली. तर नितेशने 97 किलो वजनी गटात ग्रीको रोमन प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली.
माजी विजेता सुनीलकुमारने आपल्या पदकांच्या संग्रहात आणखी एक कांस्यपदकाची भर घातली. ज्यामुळे भारतीय संघासाठी हा दिवस अत्यंत फलदायी ठरला. उपांत्य फेरीत चीनच्या हुओयिंग शी याचा पराभव करणाऱ्या ललितने अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या इख्तियोर बोतिरोव्हविरुद्ध कडवी झुंज दिली. मात्र त्याला 0-9 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.
87 किलो वजनी गटातील कांस्यपदकाच्या लढतीत सुनील कुमारने पहिल्या फेरीत चार गुण गमावल्यानंतरही जोरदार पुनरागमन केले. त्याने उझबेकिस्तानच्या मुखम्मदकोदिर सुलॉव्हचा 5-4 अशा फरकाने पराभव करत आशियाई स्पर्धेतील आपले सलग दुसरे कांस्यपदक जिंकले.
तत्पूर्वी, नितेशने 97 किलो वजनी गटाच्या ग्रीकोरोमन प्रकारात अंतिम फेरीत स्थान निश्चित करत 2025 च्या आशियाई स्पर्धेतील आपल्या कामगिरीत सुधारणा करणार असल्याचे सिद्ध केले. गेल्या वर्षी कांस्यपदक जिंकणाऱ्या या 23 वर्षीय कुस्तीपटूने उपांत्य फेरीत चीनच्या झेगांग वांगचा 7-2 अशा फरकाने पराभव केला. या विजयासह त्याने गतविजेता आणि इराणचा कुस्तीपटू मोहम्मदहादी सारावी याच्याविरुद्ध सुवर्ण पदकासाठीची लढत निश्चित केली. उपांत्य फेरीत, नितेशने पहिल्या फेरीत चिनी प्रतिस्पर्ध्याला ‘पॅसिव्हिटी’ मुळे मिळालेल्या पार टेरे (जमिनीवर स्थित) संधीचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने या संधीचा वापर करत सहा गुण मिळवले. ज्यामध्ये चार गुणांच्या एका थ्रो चा समावेश होता. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्याने अत्यंत चातुर्याने बचाव करत सहज विजय मिळवला.
82 किलो वजनी गटाच्या ग्रीकोरोमन प्रकारातही भारताला कांस्यपदक जिंकण्याची संधी उपलब्ध आहे. या गटात प्रिन्स हा कुस्तीपटू तुर्कमेनिस्तानच्या दिदार अम्मानाझारोव्हचा सामना करेल. 20 वर्षीय प्रिन्सला उपांत्य फेरीत इराणच्यामाहम्मदामिन होसेनीकडून 10-0 अशा मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र 77 किलो वजनी गटातील ग्रीकोरोमन कुस्तीच्या कांस्यपदकाच्या लढतीत अमनला निराशाच पदरी पडली. त्याने दक्षिण कोरियाच्या येओनघुन नोहकडून 14-15 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या फेरीच्या अखेरीस 7-12 अशा पिछाडीवर असूनही अमनने जोरदार पुनरागमन केले. परंतु तो केवळ एका गुणाने मागे पडला. सचिन सहरावत (67 किलो गट-ग्रीकोरोमन) यालाही कांस्यपदक जिंकण्याची संधी मिळेल. त्याने रेपेचेज फेरीत स्थान मिळवले आहे.