चांदी पाठोपाठ सोने दरात वाढ! एका दिवसात सोने एक हजार रूपयांनी महागले
कोल्हापूर प्रतिनिधी
नुकताच पितृपक्ष पंधरवड्याला प्रारंभ झाला आहे. या काळात सोने, चांदी अथवा इतर नवीन वस्तूंची खरेदी केली जात नाही. असे असतानाही पंधरवड्यातच सोने, चांदीच्या दरात वाढ झाली आहे. शुक्रवार, 20 रोजी एका दिवसात सोने 10 ग्रॅममागे एक हजार रुपयांनी तर चांदी किलोमागे 700 रुपयांनी महागली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात सोने, चांदीवरील आयात शुल्क कमी केली आहे. यामुळे ग्राहकांना सोने, चांदी दर कमी होऊन खरेदी करता येईल अशी अपेक्षा होती. पण पितृपक्ष पंधरवड्यातच कोल्हापूर सराफ बाजारामध्ये सोने, चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 20 सप्टेंबर रोजी सोन्याचा दर 10 ग्रॅमला 76300 रुपये तर चांदीचा किलोचा दर 91300 रुपये झाला आहे. 19 सप्टेंबर रोजी हाच दर 75300 व 90600 असा होता.
23 जुलैला केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सोने दर 74900 तर चांदी 90600 रुपये असा होता. अर्थसंकल्पात सोने, चांदीवरील आयात शुल्क 15 वरून 9 टक्के करण्यात आले. यामुळे त्याच दिवशी सायंकाळी सोने 10 ग्रॅम तर चांदी किलोमागे तीन हजार रुपयांनी स्वस्त झाले. त्याच दिवशी सोने 71600 तर चांदी 87500 रुपये असा दर होता. मात्र हा दर एक दिवसा पुरताच राहिला. 25 जुलैला सोने 70600 तर चांदी 83700 रुपये दर होता. यानंतर पुन्हा दरवाढ सुरू झाली आहे. 19 रोजी हा दर अनुक्रमे 75300 व 90600 असा होता. तर शुक्रवारी हाच दर अनुक्रमे 76300 व 91300 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.