Silver Rate : चांदी प्रतिकिलो 4 लाखांच्या पुढे, सोन्यानेही गाठला नवा उच्चांक
सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या
कोल्हापूर : नवी दिल्लीत गुरुवारी चांदीच्या दराने प्रतिकिलो ४ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, तर जागतिक बाजारातील जोरदार तेजी आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा वाढता ओढा यामुळे सोन्याने प्रति १० ग्रॅम १.८३ लाख रुपयांचा नवा उच्चांक गाठला. ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, चांदी दराने सलग चौथ्या सत्रात वाढ नोंदवली असून १९,५०० रुपये म्हणजेच ५.०६ टक्क्यांनी उसळी घेत सर्व करांसह ४,०४,५०० रुपये प्रतिकिलो असा विक्रमी दर गाठला आहे.
बुधवारी चांदीचा दर ३,८५,००० प्रतिकिलो इतका होता. रुपयेदरम्यान, ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा दर १२,००० रुपये म्हणजेच ७.०२ टक्क्यांनी वाढून सर्व करांसह १,८३,००० रुपये प्रति १० ग्रॅम या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. यापूर्वी सोन्याचा दर १,७१,००० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. व्यापाऱ्यांच्या मते, मौल्यवान धातूंच्या किंमतीतील ही झपाट्याने झालेली वाढ प्रामुख्याने जागतिक बाजारातील ट्रेंडशी सुसंगत आहे. वाढते भू-राजकीय तणाव आणि अमेरिकन डॉलरची कमजोरी यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वळले असून, त्यामुळे सोने आणि चांदीने जागतिक स्तरावर नवे उच्चांक गाठले आहेत.
या दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून, गुंतवणूकदार वर्गात मात्र खरेदीची हालचाल वाढलेली दिसत आहे. सध्या भारत सोने निर्यातीत जगात तिसरा देश आहे. हे एक प्रमुख कारण दर वाढीस कारणीभूत मानले जात आहे. भारताला आयात कराव्या लागणाऱ्या सोन्या-चांदीची किंमत वाढत आहे. भारतातील सोन्याच्या किमती या मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असल्याने, डॉलर रुपया विनिमय दरातील बदल भाववाढीस कारणीभूत ठरत आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडी, युद्धसदृश परिस्थिती, महागाईची भीती आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळताना दिसत आहेत. सोने हे पारंपरिकपणे 'सुरक्षित गुंतवणूक' मानले जाते. त्यामुळे अनिश्चिततेच्या काळात सोन्याची मागणी वाढते आणि दरही वाढतात.