शीख ट्रक चालकावर अमेरिकेत हल्ला
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी
भारतीय वंशाच्या शीख ट्रक चालकाला अमेरिकेत गंभीर जखमी करण्यात आले आहे. त्याला 17 वेळा भोसकण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ही भीषण घटना अमेरिकेतील व्योमिंग या प्रांतात घडली असून मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेची चौकशी होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याच्यावर हल्ला का करण्यात आला, यासंबंधी अद्याप महिती मिळालेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात पोहचविण्यात आले आहे.
हत्या करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव गुरुविंदर सिंग असे आहे. तो व्योमिंग येथील सॅक्रामेंटोचा रहिवासी होता. 28 वर्षांचा असून गेली सहा वर्षे अमेरिकेत ट्रक चालविण्याचा व्यवसाय करीत आहे. तो विश्रांती घेत असताना त्याच्या सुरीसारख्या शस्त्राने सपासप वार करण्यात आले. त्याच्या मानेवर आणि छातीवर गंभीर जखमा झाल्या असून त्याच्यावर तातडीचे उपचार केले जात आहेत.
हल्लेखोर 45 वर्षांचा
हल्ल्याच्या घटनेनंतर काही तासातच पळून गेलेल्या हल्लेखोराला अटक करण्यात आली. त्याचे नाव अँड्य्रू क्रिस बेझडॅक असल्याची माहिती देण्यात आली. तो 45 वर्षांचा आहे. तो काही वेळापासून गुरुविंदर सिंग याच्या मागावर होता. गुरुविंदरसिंग व्योमिंगहून पेन्सिलव्हानिया येथे जात असताना वाटेत विश्रांती गृहात थांबला. त्याच्या मागोमाग हल्लेखोरही तेथे पोहचला आणि त्याने अचानकपणे गुरुविंदरसिंग याच्यावर शस्त्राचे घाव घातले. या विश्रांतीगृहाच्या नजीक राहणाऱ्या एका दक्षिण अमेरिकन कुटुंबाने ही घटना पोलिसांना कळविली. ट्रक चालकाला रुग्णालयात नेण्याची व्यवस्थाही केली. ट्रक चालकाची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असून तो उपचारांना प्रतिसाद देत आहे, अशी माहिती देण्यात आली.