सिकंदरचा ट्रेलर प्रदर्शित
चालू वर्षात सिकंदर हा सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. ए.आर. मुरुगदास यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून सलमान अन् रश्मिकाच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 2023 नंतर सलमानचा कुठलाच चित्रपट प्रदर्शित झालेला नाही, परंतु मधल्या काळात तो काही चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसून आला आहे. ट्रेलरची सुरुवात रश्मिकाच्या व्यक्तिरेखेने होते, जी सिकंदरविषयी बोलताना दिसून येते. यानंतर यात दमदार अॅक्शन दिसून येतो. चित्रपटात सलमान आणि रश्मिकासोबत काजल अग्रवाल, सत्यराज, शरमन जोशी, प्रतीक बब्बर, अंजिनी धवन आणि जतिन सरना यासारखे कलाकार दिसून येणार आहेत. सिकंदर हा चित्रपट 2 तास 20 मिनिटांचा असणार आहे. या चित्रपटाकरता अॅडव्हान्स बुकिंग देखील सुरू झाले आहे. सलमानचा हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. ईदच्या तोंडावर चित्रपट प्रदर्शित होत असल्याने सलमानच्या चाहत्यांकडून याला मोठा प्रतिसाद मिळणार असल्याचे मानले जात आहे.