For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिकंदर शेखने इराणच्या अली इराणीला केले चितपट

06:04 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिकंदर शेखने इराणच्या अली इराणीला केले चितपट
Advertisement

पाच महाराष्ट्र केसरी मल्लांची उपस्थिती : व्यंकोबा मैदानावर तब्बल 122 कुस्त्यांचे आयोजन

Advertisement

प्रतिनिधी/ इचलकरंजी

शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या निकाली कुस्त्यांच्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकांची कुस्ती कोल्हापूरच्या  गंगावेस तालीमचा मल्ल सिकंदर शेख विरुद्ध इराण पैलवान अली इराणी यांच्यात झाली. यामध्ये पैलवान सिकंदर शेख याने केवळ सात मिनिटात समोरून झोळी डावावर पैलवान अली इराणी याला चितपट केले. यावेळी व्यंकोबा मैदानावर कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. या कुस्ती मैदानात लहान मोठ्या अशा 122 कुस्त्यांबरोबर मुलींच्याही प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून रवींद्र माने यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तर कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ आणि इचलकरंजी शहर तालीम संघ यांच्या मान्यतेने हे मैदान घेण्यात आले.

Advertisement

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व इराणचा मल्ल ली इराणी यांच्यातील कुस्ती प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लावण्यात आली. सुरुवातीपासून सिकंदर आक्रमक दिसत होता. पाचव्या मिनिटाला सिकंदर याने बॅकथ्रोवर इराणी याला उचलून टाकले आणि सिकंदरला विजयी घोषित करण्यात आले. मात्र, उपस्थित प्रेक्षकांनी व सिकंदर याने खिलाडीवृत्ती दाखवत निकाल अमान्य केला आणि ही कुस्ती पुन्हा लावण्यात आली. यावेळी कुस्ती शौकीनांनी जल्लोष करत दोघांच्याही खिलाडूवृत्तीला दाद दिली. त्यानंतर अवघ्या 47 सेकंदात समोरून झोळी डावावर सिकंदर याने इराणी याला पराजित करत इचलकरंजीच्या मैदानावर नाव कोरले.

महिला गटात महाराष्ट्र केसरी पैलवान अमृता पुजारी विरुध्द महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल ऋतुजा जाधव यांच्या लढतीत समोरून झोळी डावावर अमृताने ऋतुजाला चितपट केले. तर पुजा सासणे विरुद्ध सिद्धी पाटील यांच्यात गडमुडशिंगीच्या सिद्धी विजयी ठरली.

उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत विरुध्द हरियाणाचा मल्ल विकास काला यांच्यातील द्वितीय क्रमांकाच्या लढतीत खडाखडीनंतर घिस्सा डावावर किरण भगत याने काला याला चितपट केले. महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक विरुध्द महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्यातील तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत पोकळ घिस्सा डावावर बाला रफिक विजयी ठरल्याचा निकाल दिला गेला. पण, सदगीर याने तो अमान्य केल्याने चित्रफीत पाहून ही कुस्ती पुन्हा लावण्यात आली आणि काही वेळानंतर ती बरोबरीत सोडविण्यात आली. महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुध्द उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान योगेश पवार यांच्यातील चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत पोकळ घिस्सा डावावर पृथ्वीराज याने योगेशला आस्मान दाखविले. हरियाणाचा पैलवान मनजितसिंग विरुध्द महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान संदीप मोटे यांच्यात मोटे याने घुटना डावावर मनीषकुमारला पराजित केले.

महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान श्रीमंत भोसले विरुध्द महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सागर काळेबाग यांच्यात काळेबाग हा जखमी झाल्याने भोसले याला विजयी घोषित करण्यात आले. महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान प्रशांत जगताप विरुध्द महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान बाळू अपराध यांच्यात प्रशांत याने छडी टांग डावावर अपराध याला आस्मान दाखविले. यावेळी उपस्थित सर्वच मान्यवर विजेत्या पैलवानांवर बक्षिसांची लयलूट करत होते.

स्वागत व सूत्रसंचालन पैलवान अमृतमामा भोसले यांनी केले. याप्रसंगी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार राजुबाबा आवळे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आदिल फरास, मंगेश चव्हाण, विठ्ठल चोपडे, भाऊसो आवळे, रवि रजपुते, मोहन मालवणकर, पुंडलिक जाधव, मनोज साळुंखे, उदयसिंग पाटील, रविंद्र लोहार, बाबू मोहिते, अनिस म्हालदार आदींसह अन्य उपस्थित होते.

मैदानात तुडुंब गर्दी

कुस्ती पंढरी म्हणून ओळखल्या जाण्राया येथील व्यंकोबा मैदानावर अनेक महिन्यांनी मैदान भरवले गेले. त्यातच इचलकरंजीत प्रथमच तब्बल सहा महाराष्ट्र केसरी येणार असल्याने कुस्ती शौकिनांची मैदान तुडुंब भरलेले होते. अधूनमधून हलगी आणि कैताळच्या ठेक्यावर प्रेक्षकांना उत्साहित करण्यात येत होते. तसेच या कुस्ती मैदानाचे सुरेख निवेदन करत जोतिराम वाझे, सुकुमार माळी व प्रशांत चव्हाण यांनी रंगत आणली.

एकाच वेळी तीन महाराष्ट्र केसरी मैदानात

आचार संहिता लागू झाल्याने रात्री 10 च्या आत मैदान संपविण्यासाठी आयोजकांकडून एकाच वेळी क्रमांक तीन आणि चार अशा दोन मोठ्या कुस्त्या खेळवल्या गेल्या. त्यामुळे बाला रफिक, हर्षवर्धन सदगिर, पृथ्वीराज पाटील या महाराष्ट्र केसरी पैलवानांसोबत उत्तर महाराष्ट्र केसरी योगेश पवार हे मैदानात उभे ठाकले होते. त्यामुळे एकाच वेळी तीन महाराष्ट्र केसरी पैलवान मैदानात असल्याने हा क्षण खचाखच भरलेल्या मैदानाने डोळ्यात साठवले.

Advertisement
Tags :

.