सिकंदरच्या विजयाने गुरूनिष्ठा ,मित्रप्रेम तालमीबद्दलचे प्रेम अधोरेखित
सिकंदर सहकाऱ्यांनी वस्ताद विश्वास हारूगले यांच्या प्रति केली कृतज्ञता व्यक्त
सांगरुळ प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे झालेल्या 66 व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत गंगावेस तालमीचा पैलवान सिकंदर शेखने गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे याचे वर चटकदार विजय मिळवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. सिकंदरच्या या त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. विजयानंतर घडलेल्या अनेक बाबीमुळे सध्याच्या या बदलत्या पिढीत सुद्धा शिष्याची गुरुप्रती असणारी गुरुनिष्ठा व सहकारी मित्रांच्याप्रती असणारे मित्रप्रेम तालमीत असणारी ईर्षा अधोरेखित झाली आहे.
प्रेक्षणीय कुस्ती करत महाराष्ट्र केसरी किताब पटकाविताच सिकंदर शेखने तालमीचे वस्ताद पैलवान विश्वास हारूगले तसेच तालमीतील ज्येष्ठ पैलवान आस्लम काझी विशाल बनकर यांच्यासह तालमीतील सर्वच आजी माजी पैलवानांच्या बद्दल कृतीतून व शब्दातून व्यक्त केलेल्या भावना, सोशल मीडिया मधून प्रसिद्ध झालेल्या बातम्या व प्रतिक्रिया यांची जोरदार चर्चा सर्वच क्षेत्रात रंगू लागली आहे.
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत नात्या नात्यांमध्ये तसेच व्यक्ती व्यक्तीमध्ये दुरावा निर्माण होत चाललेला सर्वत्र पाहायला मिळतो. पण सिकंदर शेखने विजयी होताच तालमीचे ज्येष्ठ मल्ल कुस्ती सम्राट अस्लम काझी यांच्या गळ्यात किताब अडकला त्यांच्या खांदेवर गदा दिली व त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन आखाड्यामधून फेरी मारत त्यांच्याबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त केली .गंगावेस तालमीचा नम्र व तुफानी मल्ल आस्लम काझी यांच्या धडाकेबाज कामगिरीने गंगावेस तालमीसह संपूर्ण कुस्ती क्षेत्रातून त्यांना महाराष्ट्र केसरीची मिळवावी अशी अपेक्षा होती .पण त्यांनाही महाराष्ट्र केसरीच्या गदेने हुलकवणी दिली होती याची सल सिकंदरसह तालमीतील सर्वच मल्लांना लागून राहिली होती . तालमीतील आपला दुसरा सहकारी ज्याच्या बरोबर दोन्ही स्पर्धात काटा कुस्ती झाली त्या उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर याला तालमीत येताच खांद्यावर घेऊन जल्लोष केला.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना सिकंदर सह इतर ज्येष्ठ मल्लानी गंगावेश तालमीचे वस्ताद विश्वास हारुगले यांचे महाराष्ट्र केसरीची गदा तालमीला आणण्याचे स्वप्न सिकंदरच्या रूपाने साकार झाल्याची प्रतिक्रिया दिली .बहुतांशी पैलवान कुस्ती क्षेत्रातून निवृत्ती घेतल्यानंतर गावी जाऊन आपला पारंपरिक व्यवसाय किंवा नवी क्षेत्र निवडून स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतात पण विश्वास हारुगले यांनी आपला प्रपंचा बाजूला ठेवून गेली पंधरा-सोळा वर्षे कोगे गावातून गंगावेस तालमीत सकाळ संध्याकाळ येऊन मल्लांचा कडक सराव करून घेतल्याने चांगले पैलवान घडत आहेत .तालमीलाही गदा मिळण्यामध्ये त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिक्रिया तालमीचे आजी-माजी मल्ल व्यक्त करत आहेत.
साधे वागणे असणारे हारुगले वस्ताद शिस्तीत मात्र फारच कठोर आहेत.त्यांच्याकडे सराव करणाऱ्या तालमीतील लहान थोर सर्वच
आजी माजी पैलवानांच्यात त्यांच्याबद्दल आदर युक्त भीती आहे. व्यायामत कसर केल्यानंतर त्यांचा पैलवानांना मार ठरलेला असतो .व्यायामात कसर केल्यामुळे वस्तादांचा मार बसल्याचे अनेक नामवंत' मल्ल आज बोलून दाखवतात . कोल्हापूरच्या सर्वच तालमीत आज खुल्या गटात लागणाऱ्या मल्लांची वाणवा असताना नगंगावेस तालमीत आज माऊली जमदाडे विशाल बनकर दत्ता नरळे यासारखे अनेक मोठ्या जोडीत लढणारे मल्ल आहेत .या सर्वांनीच दैदिप्यमान कामगिरी करत तालमीचे वस्तादांचे नाव भारतभर केले आहे .ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी सुरुवातीच्या काळात गंगावेश तालमीत सराव करत होते त्यांनी सिकंदरचे अभिनंदन करताना वस्ताद विश्वास हारुगले यांचे स्वप्न साकार झाल्याचे सांगितले आहे.
तालमीचे एक माजी मल्ल व सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पैलवान संग्राम कांबळे यांनी तालमीतील मुलांना प्रेरणा देण्यासाठी गेल्या वर्षीच गंगावेश तालमीला महाराष्ट्र केसरीची गदा मिळाल्यास त्या पैलवानाचे हत्तीवरून मिरवणूक करण्याची घोषणा केली आहे.
सिकंदरच्या विजयाने कुस्तीशौकीनांच्या आशा पूर्ण झाल्या आहेत . सिकंदरचे सर्वत्र कौतुक होत आहे .पण याहीपेक्षा गुरुनिष्ठा व मित्रनिष्ठे बरोबरच तालमीबद्दल असणारा आदर कसा असतो याची दर्शन होते.