वैद्यकीय सेवा आज कोलमडण्याची चिन्हे
कोलकाता बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ देशातील डॉक्टरांकडून संपाची हाक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, कोलकाता
कोलकाता येथील मेडिकल कॉलेजच्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येनंतर डॉक्टरांमध्ये संताप पसरला आहे. फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने याप्रकरणी संपाचा निर्णय घेतला आहे. फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन म्हणजेच ‘एफओआरडीए’ने (फोर्डा) देशभरातील ऊग्णालयांमधील वैद्यकीय सेवांसाठी सोमवारपासून संपाची घोषणा केली आहे. डॉक्टरांची सुरक्षा आणि संरक्षण सुनिश्चित न केल्यास सोमवारपासून ऊग्णालयातील सेवा बंद करण्यात येईल, असा अल्टिमेटम ‘फोर्डा’ने दिला आहे. या संपामुळे दिल्लीतही राम मनोहर लोहिया यांच्यासह अनेक ऊग्णालयांतील वैद्यकीय सेवा प्रभावित होणार आहेत. डॉक्टरांनी संप केल्यास आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्या तरी ओपीडी, ऑपरेशन थिएटर आणि वॉर्ड ड्युटी सेवेवर परिणाम होणार आहे.
‘फोर्डा’ने रविवारी मागण्यांचे निवेदन देऊन संपाचे पत्र जारी केले आहे. त्यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह देशातील अनेक ऊग्णालयांनी संपाला पाठिंबा देत ऊग्णालय सेवा बंद ठेवण्याचे आवाहन केले. दिल्लीतील डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटल, मौलाना आझाद मेडिकल कॉलेज, लेडी हार्डिंज मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, दीनदयाल उपाध्याय हॉस्पिटल, गुऊ तेग बहादूर हॉस्पिटलमधील ओपीडी, ऑपरेशन थिएटर आणि वॉर्ड ड्युटीवरील निवासी डॉक्टरांचा सोमवारपासून संप होणार आहे. मात्र, आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. डॉक्टरांच्या संघटनांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. रविवारी दिल्लीतील आरएमएल ऊग्णालयाच्या डॉक्टरांनीही कँडल मार्च काढला.
मेडिकल कॉलेजच्या अधीक्षकांना हटवले
प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येविरोधात राज्यभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने रविवारी आरजी कार मेडिकल कॉलेजच्या अधीक्षकांना त्यांच्या पदावरून हटवले. आरजी कार मेडिकल कॉलेजच्या संपूर्ण सुरक्षा यंत्रणेत त्रुटी असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला आहे. ऊग्णालयाच्या आवारात सीसीटीव्ही पॅमेऱ्यांची संख्या वाढवण्याची आणि चोवीस तास कडक पाळत ठेवण्याची मागणी डॉक्टरांनी केल्यानंतरही व्यवस्थापनाने याकडे लक्ष दिलेले दिसून येत नाही.
संशयित आरोपी पोलीस कोठडीत
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून केल्याचा आरोप असलेला संजय रॉय 14 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. चौकशीत संजयने बलात्कार आणि खून केल्याची कबुली दिली आहे. त्याला 9 ऑगस्ट रोजीच अटक करण्यात आली होती. पोलिसांना मदत करण्यासाठी संजय हॉस्पिटलमध्ये नागरी स्वयंसेवक म्हणून काम करायचा. त्याचा फोन तपासला असता त्यात पॉर्न व्हिडिओही आढळून आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.