इराणवर पुन्हा हल्ला करण्याचे संकेत
अध्यक्ष ट्रंप यांचा इशारा, समुद्रतळाशी असणाऱ्या केबल्स तोडण्याची इराणची धमकी, पुन्हा संघर्ष
इराणने अटी मानल्या नाहीत तर त्या देशावर पुन्हा हल्ला केला जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे. तसेच भविष्यातील हल्ला अधिक दाहक आणि विनाशक असेल, असेही प्रतिपादन केले आहे. तर अमेरिकेने हल्ला केल्यास आखातात समुद्रतळाशी असणाऱ्या इंटरनेट केबल्स तोडण्याची धमकी इराणने दिली आहे. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा संघर्ष उफाळण्याची चिन्हे आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाला आता आठ महिने झाले आहेत. संघर्ष थांबविण्यासाठी प्रयास केले जात असताना पुन्हा संघर्षाची शक्यता आहे.
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन डीसी
सध्या अमेरिकेत लोकप्रतिनिधीगृहांच्या मध्यावधी निवडणुकांचे वातावरण आहे. ट्रंप यांनीही रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी दौरे काढण्यास प्रारंभ केला आहे. फ्लोरिडा येथील एका जाहीर सभेत भाषण करताना त्यांनी इराणवर पुन्हा हल्ला करण्याचे संकेत दिले. यावेळचा हल्ला दीर्घकाळ चालणार नाही. तथापि, तो अधिक तीव्र असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेत 2 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुका अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात.
इराणची धमकी
अमेरिकेने पुन्हा हल्ला केल्यास इराण आखातातील देशांच्या जोडणाऱ्या इंटरनेटच्या केबल्स तोडून टाकेल, अशी धमकी इराणकडून देण्यात आली. इराणने ही धमकी खरी केल्यास आखातातील अनेक देशांमध्ये इंटरनेट सेवा खंडित होऊ शकेल. त्यामुळे बँकिंग आणि इतर सेवा प्रभावित होऊन अर्थव्यवस्थेला धक्का पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे आखाती देश सावध झाले असून त्यांनी स्वत:च्या संरक्षणासाठी सज्ज होण्यास प्रारंभ केला आहे, अशी माहिती दिली गेली.
संघर्ष संपवू शकतो त्वरित
अमेरिकेच्या मनात आले, तर अमेरिकेची सेनादले इराणशी होत असलेला संघर्ष त्वरित संपवू शकतात. तथापि, मोठ्या प्रमाणावर संभाव्य हानी टाळण्यासाठी अमेरिका संयमाने कारवाई करीत आहे. इराणने याचा चुकीचा अर्थ काढून अमेरिकेला दुर्बळ समजण्याची चूक करु नये. तसे केल्यास अमेरिका आपले अधिक बळ उपयोगात आणण्यास मागेपुढे पाहणार नाही. त्यामुळे होणाऱ्या हानीस इराण उत्तरदायी असेल, असाही मोठा इशारा डोनाल्ड ट्रंप यांनी भाषणात दिला.
तुर्किये, फ्रान्सचा विरोध
इराणवर अमेरिकेने पुन्हा हल्ला केल्यास त्याला आमचा विरोध असेल, असे प्रतिपादन तुर्किये आणि फ्रान्स या देशांनी केले आहे. आणखी हल्ले केल्यास शांतता चर्चा पूर्णत: अपयशी ठरेल. तसेच युद्ध अधिक व्यापक होऊ शकते. त्यामुळे आता शांतता प्रस्थापित करणे हेच अपेक्षित आहे, असे या देशांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मध्यपूर्वेतील युद्ध आणखी भडकल्यास कच्च्या इंधन तेलाचे दर आणखी वाढतील आणि त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था मंदावू शकते. याचा विचार सर्व संबंधितांनी करावयास हवा, असे प्रतिपादन फ्रान्सकडून करण्यात आले आहे.
केबल्स तोडल्यास काय होणार
जगभरात इंटरनेट सेवा समुद्रतळाशी टाकलेल्या केबल्सच्या माध्यमातून पुरविली जाते. इराणनजीक असणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतूनही काही केबल्स जातात. तथापि, जगातील एकंदर केबल्सच्या तुलनेत या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या केबल्सचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे जगभरातील इंटरनेट सेवेवर फारसा परिणाम होणार नाही. मात्र, ओमान, कतार, संयुक्त अरब अमिराती अशा काही स्थानांमध्ये इंटरनेट सेवा खंडित होऊ शकते. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या केबल्सची किती प्रमाणात हानी होते, यावर सेवा कितीकाळ खंडित राहील, हे अवलंबून राहणार आहे, अशी माहिती अनेक इंटरनेट तज्ञांकडून देण्यात आली.
