लेबनॉनमधील संघर्ष थांबण्याची चिन्हे
इस्रायल-हिजबुल्लाह यांच्यात शस्त्रसंधी लवकरच
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात लेबनॉनमध्ये सुरू असलेला संघर्ष लवकरच थांबू शकतो. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्याकडून तात्विक मंजुरी मिळाल्यावर इस्रायलचे मंत्रिमंडळ शस्त्रसंधीच्या प्रस्तावावर मतदान करणार आहे. इस्रायलने लेबनॉनमध्ये दोन महिन्यांपासून भीषण हल्ले केले आहेत. इस्रायलच्या कारवाईत लेबनॉनमध्ये आतापर्यंत 3700 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला असून लाखो लोक बेघर झाले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून इस्रायल अन् हिजबुल्लाहमधील शस्त्रसंधीची घोषणा केली जाऊ शकते. काही मुद्दे वगळता प्रस्तावावर सहमती झाली असल्याचे समजते. ही शस्त्रसंधी अमेरिकेने करविली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने होणाऱ्या या कराराची सुरुवात दोन महिन्यांच्या शस्त्रसंधीने होणार आहे. यादरम्यान इस्रायलचे सैन्य लेबनॉनमधून माघारी फिरणार असून हिजबुल्लाह लिटानी नदीच्या दक्षिणेस स्वत:ची सशस्त्र उपस्थिती समाप्त करणार आहे. हा भाग इस्रायलच्या सीमेपासून सुमारे 10 मैल अंतरावर आहे.
कराराच्या अंतर्गत दोन्ही बाजूने सैनिक मागे गेल्यावर संयुक्त राष्ट्रसंघ पर्यवेक्षक दलाचे जवान या क्षेत्रात तैनात केले जाणार आहेत. युद्धविराम करार आणि संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव 1701 च्या अंमलबजावणीच्या देखरेखीसाठी एक आंतरराष्ट्रीय समिती स्थापन केली जाणार आहे. हा प्रस्ताव 2006 मध्ये इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात झालेले युद्ध समाप्त करण्यासाठी संमत करण्यात आला होता, परंतु कधीच तो पूर्णपणे लागू करण्यात आला नव्हता.
शस्त्रसंधी जवळपास निश्चित असली तरीही काही मुद्द्यांवर अद्याप सहमती झालेली नाही. इस्रायल हिजबुल्लाहने कराराचे उल्लंघन केल्यावर लेबनॉनवर हल्ला करण्याचे स्वातंत्र्य इच्छितो. तर लेबनॉनच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकार देशाच्या सार्वभौमत्वाचा उल्लंघन करणारा ठरेल अशी भूमिका घेतली आहे. आक्रमकतेचा पूर्णपणे अंत सामील नसलेला कुठलाही करार मान्य नसेल असे हिजबुल्लाहचा नेता नईम कासिमने म्हटले आहे.