For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराण-अमेरिकेदरम्यान युद्धसहमतीचे संकेत

06:58 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराण अमेरिकेदरम्यान युद्धसहमतीचे संकेत
Advertisement

ट्रम्प यांनी हल्ले तात्पुरते रोखले : सौदी अरेबियाकडून कारवाई थांबवण्याचे आवाहन

Advertisement

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन, तेहरान

Advertisement

अमेरिका आणि इराण यांच्यातील तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, जगासाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मध्य-पूर्वेकडील देश आणि खुद्द इराणच्या विनंतीवरून अमेरिकेने आठवड्याच्या अखेरीस इराणवरील नवीन अण्वस्त्र हल्ले तात्पुरते थांबवले आहेत, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. याचदरम्यान त्यांनी पाच महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी एका कराराच्या अटींवर सहमती होत असल्याचेही स्पष्ट केले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नवीन लष्करी हल्ले थांबवण्याची हमी दिली आहे. राजनयिक कराराच्या दिशेने प्रगती झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी शनिवारी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही घोषणा करताना हा निर्णय अंतिम नाही, असेही स्पष्ट केले. जर लवकरच करार झाला नाही, तर हल्ले पुन्हा सुरू होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले. फेब्रुवारीच्या अखेरीस इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर युद्धाला सुरुवात झाल्यापासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्याच्या करारामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ, पूर्णपणे आणि निर्बंधांशिवाय खुली करणे आणि इराणचा अण्वस्त्र धोका नाहीसा करणे यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या दाव्यामुळे या प्रदेशातील तणाव कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे, परंतु जोपर्यंत करार अंतिम होऊन त्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत यावर अधिक काहीही सांगणे शक्य होणार नसल्याचे मत आंतरराष्ट्रीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, मध्य-पूर्वेकडील देशांनी अमेरिकेला लष्करी कारवाई स्थगित करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या दाव्यानुसार एका करारावर सहमती झाल्यामुळेच हल्ल्याच्या योजना सध्यापुरत्या थांबवण्यात आल्या आहेत. तथापि, त्यांनी कराराच्या सविस्तर अटी उघड केल्या नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रस्तावित करारामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होईल आणि इराणचा अणुबॉम्बचा धोका संपुष्टात येईल, असे म्हटले आहे.

इस्रायललाही राजी केल्याचा दावा

पाच महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध संपवू शकेल असा इराणसोबतचा करार करण्यासाठी अमेरिकेसोबत काम करण्यास इस्रायलनेही सहमती दर्शवली आहे. तथापि, इस्रायलकडून तात्काळ कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. दरम्यान, इराणने अमेरिकेला कोणत्याही ‘धाडसी कारवाई’विरुद्ध पुन्हा एकदा इशारा दिला आहे. अमेरिकन किंवा इस्रायली हल्ल्याच्या घटनेत इराण निर्णायकपणे आणि त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देईल, असे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी तुर्की, पाकिस्तान आणि सौदी अरेबियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर बोलताना सांगितले.

Advertisement
Tags :

.