For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजकीय वादळाची चाहूल

06:43 AM Jun 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
राजकीय वादळाची चाहूल
Advertisement

जर सत्ताधारी म्हणजे गुंगा तर विरोधक म्हणजे काडी पहेलवान. फुक केले की उडून जाऊ शकतात. कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शाम भटाची तट्टाणी; पुढील महिन्यात होत असणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी देशाच्या राजकारणात बरीच पडझड होणार याची ठळक चिन्हे आता दिसू लागली आहेत. काहीही करून विरोधकांच्या मुसक्या बांधायच्या सत्ताधाऱ्यांनी ठरवलेले दिसत आहे.

Advertisement

इराणचे युद्ध संपले तरी देशातील महागाई कमी होण्याची धूसर शक्यता दिसत नाही आहे. येत्या काळात तेल आणि गॅसची स्थिती मात्र सुधारण्याची शक्यता आहे; आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव कमी होऊ लागले आहेत ही एक चांगली गोष्ट आहे. नवीन परिस्थितीत इराणलादेखील भारताला तेल विकण्याची संधी हवी आहे, येत्या आठवड्यात नवी दिल्लीत होत असलेल्या ब्रिक्सच्या बैठकीला त्याने आपल्या पेट्रोलियम मंत्र्याला प्रतिनिधी म्हणून पाठवण्याचे ठरवले आहे. पण अशावेळी देशापुढे एक नवीनच संकट वाढून ठेवलेले आहे. यावर्षी मान्सूनची मेहेरनजर राहणार काय? याबाबत देशभर चिंता वाढत आहे. एल निनोचे संकट भारतावर ओढवणार काय? अशी उलटसुलट चर्चा सुरु झालेली आहे. अशावेळी हवालदिल शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

अशा आव्हानात्मक परिस्थितीत राजकीय खेळ मात्र रंगात आलेला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत असली तरी त्याकडे हेतुपुरस्सर कानाडोळा केला जात आहे. गेल्या 50-60 वर्षात कोणाला फारसे जमले नसलेला एकछत्री अम्मल जवळजवळ पूर्ण देशात आणणे भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांना जमलेले आहे, अशा बढाया मारल्या जात आहेत. पुढील महिन्यात होत असणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी देशाच्या राजकारणात बरीच पडझड होणार याची ठळक चिन्हे आता दिसू लागली आहेत. काहीही करून विरोधकांच्या मुसक्या बांधायच्या सत्ताधाऱ्यांनी ठरवलेले दिसत आहे.

Advertisement

काल परवापर्यंत विरोधकांमधील सर्वात झुंझार नेत्या समजल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जी यांचा जणू बाडबिस्तार हलवण्याचे काम बंगाल आणि नवी दिल्लीत युद्धपातळीवर सुरु झाले. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे त्यांच्या तृणमूल काँग्रेसचा डोलारा पडू लागला आहे. तृणमूल काँग्रेसविरुद्धची मोहीम सुरु असताना मुंबई आणि दिल्लीत ‘ऑपरेशन टायगर’ चा बार उडवून देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संसदीय दलात खिंडार पाडण्याचे काम सुरु करून गृहमंत्री अमित शाह हे ठाकरे घराण्याला दिवाळखोर करायला निघाले आहेत. जेव्हापासून ठाकरे यांनी सरकार स्थापनेच्या वेळी कथितपणे भाजपला दगा दिला तेव्हापासून शाह आणि ठाकरे यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची खुन्नस आहे हे राजकीय वर्तुळात लपून राहिलेले नाही. आज ना उद्या ठाकरे यांच्याविरुद्ध शाह कारवाई करणार हे बोलले जात होते पण त्याला इतक्या लवकर हिरवा कंदील दिला जाईल याविषयी शंका होती.

शोलेमधील एक फेमस डायलॉग आहे: ‘गब्बर से केवल एकही आदमी बचा सकता हैं. खुद गब्बर’, त्याप्रमाणे भाजप श्रेष्ठींच्या पायाशी दंडवत जो घालेल तोच तरेल, अन्यथा मरेल असेच एकूण चित्र आहे. ममतादीदींच्या पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापुढे जोरदार बाजू मांडून पक्षातील 20 फुटीर खासदारांना अपात्र ठरवण्याची केलेली मागणी कितपत मान्य होईल यात शंकाच आहे. चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीवर सर्वोच्च न्यायालयाने बरेच मुख्य न्यायाधीश बदलले गेले तरी अजून निकाल दिलेला नाही हा प्रकार पुरेसा बोलका आहे. उद्धव सेनेच्याबाबतीत संसदीय पक्ष तोडण्याच्या विरोधात जी पाऊले उचलली जात आहेत त्याचा बदललेल्या परिस्थितीत कितपत फायदा होईल याबाबत शंकाच आहे.

तृणमूल काँग्रेसचे एक माजी खासदार आणि एक निस्पृह सनदी अधिकारी म्हणून नावारूपाला आलेल्या जवाहर सरकार यांनी भाजप ज्यापद्धतीने पक्ष गिळंकृत करत आहे त्यामुळे त्याला जबर अपचन होण्याची शक्यता आहे, असा इशारा दिलेला आहे. तृणमूल काँग्रेससारख्या अतिशय कीड लागलेल्या पक्षाला ज्या आवडीने सत्ताधारी पक्षाने खाणे सुरु केले आहे त्याने केवळ अजीर्ण होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी प्रतिपादन केलेले आहे. हलाहल प्राशन करण्याची क्षमता केवळ नीलकंठ महादेवातच आहे दुसऱ्या कोणात नाही, अशी कोपरखळी देखील त्यांनी मारली आहे. सनदी अधिकारी सरकार यांनी दोन वर्षांपूर्वी ममतादीदींना भेटून पक्षातील बऱ्याच अनिष्ट गोष्टींना पायबंद घालायची मागणी केली होती. त्यांना केवळ तोंडदेखले आश्वासनच मिळाले हे दिसून आल्यावर त्यांनी राज्यसभेची दोन वर्षे शिल्लक असतानाच राजीनामा दिला होता.

एकीकडे तृणमूल काँग्रेस तर दुसरीकडे शिवसेना (उद्धव) यांची वासलात लावण्याचे काम सुरु केल्यावर भाजपचा आता डोळा साहजिकपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर राहील असे समजले जाते.

सत्ताधाऱ्यांच्या या ‘फोडा आणि झोडा’ नीतीमुळे पुढील महिन्यातील संसदेचे अधिवेशन वादळी ठरणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये लवकरच निवडणूका असल्याने समाजवादी पक्ष येत्या अधिवेशनात सर्वात जास्त आक्रमक राहण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे आता अनभिषिक्त नेते झालेल्या राहुल गांधी यांची देखील या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. नवीन परिस्थितीत भाजपला उत्साह आलेला आहे आणि उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या पुढील वर्षीच्या प्रारंभी होणाऱ्या निवडणूका येत्या नोव्हेंबरमध्ये घेण्याचे त्याचा मनसुबा दिसत आहे. विरोधकांना बेसावधपणे खिंडीत पकडण्यासाठी डाव रचला जात आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.