कॅन्सरवरील औषधांच्या किमतीत मोठी कपात
543 औषधांच्या दरात घट : नवीन दर 9 नोव्हेंबरपासून लागू होणार,80 हजारांचे इंजेक्शन होणार 7,000 रुपयांना उपलब्ध,40,000 दराच्या कॅप्सूलची किंमत आता 2,700 रुपये
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशातील कर्करोगाच्या (कॅन्सर) 543 औषधांच्या ब्रँड्स आणि पॅक्सच्या किमती सुधारण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाच्या (एनपीपीए) निर्णयानुसार, 397 औषधांच्या म्हणजेच 73 टक्के औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. यापैकी 217 औषधांच्या किमती निम्म्याहून अधिक कमी करण्यात आल्या आहेत. 97 ब्रँड्सच्या किमती 70 टक्क्यांपेक्षा जास्त आणि 50 ब्रँड्सच्या किमतीत 80 टक्क्याहून अधिक कपात करण्यात आली आहे. तसेच पाच औषधांच्या किमतीत 90 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. येत्या दोन आठवड्यांत भारतातील कर्करोगाची काही औषधे आजच्या तुलनेत लक्षणीयरीत्या स्वस्त होणार आहेत. सर्वात मोठी कपात सॅमटेपा किंवा थिओटेपा इंजेक्शनमध्ये झाली असून, त्याची किंमत 80,071 रुपयांवरून 7,150 रुपये झाली आहे.
पाल्बोप्रोच्या 21 कॅप्सूलच्या पॅकची किंमत 40,421 रुपयांवरून 2,720 रुपये झाली आहे. कर्करोगाची अनेक औषधे अजूनही महाग आहेत, परंतु सरकारच्या एका निर्णयामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. 137 नॉन2-शेड्यूल्ड कर्करोगविरोधी औषधांवरील व्यापारी नफा 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी औषधांच्या किमतींवर नियंत्रण का ठेवले जात नाही, असा प्रश्न एनपीपीएला विचारला होता. यानंतर, कंपन्यांनी नवीन किमती जाहीर केल्या असून त्या 9 नोव्हेंबरपासून लागू होतील. तथापि, 146 ब्रँडेड औषधांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
काही महागड्या औषधांच्या किमती स्थिर
अनेक कर्करोग औषधांच्या किमती कमी झाल्या असल्या तरी काही महागड्या औषधांच्या किमती अपरिवर्तित राहिल्या आहेत. यामध्ये 21 पेक्षा जास्त प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कीट्रुडा या इम्युनोथेरपी औषधाचा समावेश आहे. त्याची किंमत 2,16,500 रुपये इतकीच आहे. स्तन कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रिबोसायक्लिबची किंमत देखील 24,435 रुपये इतकीच आहे. याव्यतिरिक्त टॅग्रिसो, टेसेंट्रिक, डार्झालेक्स आणि इम्फिन्झी यांसारख्या औषधांच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
...या औषधांच्या किमतीत मोठी घट
- पॅल्बोसायक्लिब : 40,421.33 रुपयांवरून 2,720 रु. (स्तन कर्करोगाचे औषध)
- थिओटेपा : 80,071.86 रुपयांवरून 7,150.33 रु. (केमोथेरपी इंजेक्शन्स)
- एबिरालाईव्ह टॅब्लेट : 28,000 रुपांवरून 4,840 रु. (प्रोस्टेट कर्करोगाचे औषध)
- वोमाझोल (10 टॅब्लेट) : 458.85 रुपयावरून 39.52 रु. (स्तन कर्करोग औषध)
- इवुझुमॅब (400 मिग्रॅ इंजेक्शन) : 69,852.12 रुपयांवरून 13,512 रु. (कोलोरेक्टल, फुफ्फुस, किडनीचा कर्करोग)
