औद्योगिक उत्पादनात लक्षणीय वाढ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या औद्योगिक उत्पादनाने पुन्हा एकदा उचल खाल्ल्याचे दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनाने 3.1 टक्क्यांची बऱ्यापैकी वाढ दर्शविली आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत, तसेच मागच्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय म्हणावी अशी आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
गेल्या 21 महिन्यांमध्ये प्रथमच ऑगस्ट महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा विकास दर नकारात्मक झाला होता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये हा दर पुन्हा सकारात्मक स्थितीत आला आहे. तथापि, अद्यापही वीज उत्पादन आणि खाण क्षेत्रांचा उत्पादन दर केवळ अनुक्रमे 0.5 टक्के आणि 0.2 टक्के इतक्या मर्यादेतच आहे. सप्टेंबरमध्ये उत्पादनाचा दर 0.7 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे. तथापि, डिसेंबर 2023 पासूनची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी वाढ आहे.
आठ महत्वाची क्षेत्रे
आठ महत्वाच्या औद्योगिक क्षेत्रांचा उत्पादन दर सप्टेंबरमध्ये किंचित वाढला. तरीही तो त्या पूर्वीच्या दहा महिन्यांमधील सर्वात कमी आहे. ही आठ क्षेत्रे भारताच्या औद्योगिक उत्पादनाला 40 टक्क्यांचे योगदान करतात. त्यामुळे ती महत्वाची मानण्यात येतात. तथापि, सप्टेंबरमधील या क्षेत्रांचा उत्पादन दर गेल्यावर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत 2 टक्के अधिक आहे, ही समाधानाची बाब आहे, असे मत या क्षेत्रांशी संबंधित अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
ऑक्टोबरच्या तुलनेत सरस
ऑक्टोबरमध्ये उद्योग क्षेत्राच्या 23 विभागांपैकी 11 विभागांचा उत्पादन दर नकारात्मक होता. मात्र, सप्टेंबरमध्ये ही संख्या घटून 5 इतकीच राहिली आहे. तथापि, संगणक आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगाचा उत्पादन वाढ दर ऑगस्टमध्ये 10 टक्क्यांहून अधिक होता, तो सप्टेंबरात अवघा 1.3 टक्के राहिला आहे. विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत औद्योगिक उत्पादनाचा वाढदर 4 टक्के राहिला आहे. तो त्याच्या मागच्या तिमाहीत 6.2 टक्के होता. मॅन्युफॅक्चरिंग आणि खाण क्षेत्रांच्या थंडावलेल्या कामगिरीमुळे एकंदर औद्योगिक उत्पादनवाढीवर परिणाम झाला आहे, असे स्पष्टपणे दिसते असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.