भारतात ‘ईव्ही’ वाहन विक्रीत मोठी वाढ
किरकोळ विक्री 24 टक्क्यांनी वधारुन 24.52 लाख युनिट्सच्या घरात
वृत्तसंस्था/नवीदिल्ली
आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतातील अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून आता बाजारात इलेक्ट्रिक वाहने म्हणजेच ईव्ही विकल्या जात आहेत. त्याचबरोबर, हळूहळू लोकही इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास पसंती देत असल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतातील ईव्हीची किरकोळ विक्री 24.6 टक्क्यांनी वाढून 24.52 लाख युनिट्सवर पोहोचली आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) ने दिली आहे. प्रत्येक श्रेणीत दुहेरी अंकी वाढ दिसून आली आहे, ज्यामुळे आर्थिक वर्ष 2026 हे भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या प्रवासात एक मैलाचा दगड ठरले आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची विक्री सुमारे 1,99,923 युनिट्स आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये ही विक्री 1,08,873 युनिट्स होती. अशाप्रकारे, इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांच्या विक्रीत 83.63 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.
इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री (आर्थिक वर्ष 2026)
इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री 14,01,818 युनिट्स होण्याची अपेक्षा आहे, जी आर्थिक वर्ष 2025 मध्ये 11,50,790 युनिट्स होती. अशाप्रकारे, तिच्या विक्रीत 21.81 टक्के वाढ झाली आहे. या विभागात, टीव्हीएस मोटर कंपनी 3,41,513 युनिट्ससह अव्वल स्थानावर आहे. बजाज ऑटो 2,89,349 युनिट्ससह आणि एथर एनर्जी 2,39,178 युनिट्ससह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
तिचाकी, व्यावसायिक वाहन विक्री
आर्थिक वर्ष 2026 मध्ये इलेक्ट्रिक तिचाकी वाहनांची विक्री 8,30,819 युनिट्सवर पोहोचली आहे, जी आर्थिक वर्ष 2025 मधील 6,98,914 युनिट्सच्या तुलनेत 18.97 टक्क्यांनी वाढली आहे. याव्यतिरिक्त, याच कालावधीत इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत सर्वाधिक वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये व्यावासायिक वाहन विक्री 19,454 युनिट्सवर पोहोचली, तर आर्थिक वर्ष 2025 मध्ये ती 8,820 युनिट्स होती. ही 120.57 टक्क्यांची वाढ दर्शवते.