For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काश्मीरमध्ये किमान तापमानात मोठी घट

06:02 AM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
काश्मीरमध्ये किमान तापमानात मोठी घट
Advertisement

सोनमर्गमध्ये उणे 11.2 अंश सेल्सिअस : हिमाचल प्रदेश नजिकच्या राज्यांना हिमवर्षावाचा फटका

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर, नवी दिल्ली

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे तीव्र थंडी पडत आहे. गुरुवारी रात्री बहुतेक भागात किमान तापमान शून्य अंशांपेक्षा कमी झाले. सोनमर्ग हे सर्वात थंड ठिकाण ठरले असून तेथे उणे 11.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. गुलमर्गमध्ये उणे 9 अंश सेल्सिअस आणि कुपवाडामध्ये उणे 3.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. याचदरम्यान हरियाणा आणि पंजाबमधील पाच शहरांमध्ये 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे.

Advertisement

काश्मीरप्रमाणेच पंजाब आणि हरियाणामध्येही थंडीची लाट आहे. गुरुवारी दोन्ही राज्यांमधील 5 शहरांमध्ये तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. हरियाणात नारनौलमध्ये 2 अंश सेल्सिअस आणि भिवानीमध्ये 2.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली. पंजाबमध्ये फरीदकोटमध्ये 3 अंश सेल्सिअस, भटिंडामध्ये 3.8 अंश सेल्सिअस आणि फिरोजपूरमध्ये 3.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली. शुक्रवारी सकाळी चंदीगड शहर दाट धुक्याने व्यापलेले दिसत होते. पंजाबमध्ये अमृतसर येथील वातावरण सर्वात थंड होते. येथे किमान तापमान 3.7 अंश सेल्सिअस होते. हरियाणातील भिवानीमध्ये पारा 5.5 अंशांपर्यंत घसरला.

मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये धुके, अपघातात 7 जणांचा मृत्यू

दरम्यान, शुक्रवारी सकाळी मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील अनेक जिह्यांमध्ये दाट धुके पसरले. धुक्यामुळे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील भिंड रोड महामार्गावर एका ट्रकची एका कारला धडक बसली. या अपघातात कारमधील चारही प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.  राजस्थानच्या भिलवाडा जिह्यात राष्ट्रीय महामार्ग 58 वर पाचपेक्षा जास्त वाहनांची टक्कर झाली, ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आणि सहा हून अधिक जण जखमी झाले. या अपघातामुळे महामार्गावर सुमारे एक तास 4 किलोमीटर लांबीचा जाम झाला.

हिमाचल प्रदेशप्रमाणेच नजिकच्या इतर राज्यांनाही हिमवर्षावाचा फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बर्फवृष्टीनंतर शुक्रवारी उत्तराखंडमध्ये सूर्यप्रकाश पडला होता. तथापि, बद्रीनाथ, केदारनाथ आणि गंगोत्रीमधील रस्ते 3 ते 4 फूट बर्फवृष्टीने झाकलेले दिसून आले. चमोलीमधील औली येथे सुमारे 2 फूटांपर्यंत बर्फवृष्टी झाली होती. अजूनही पुढील आठवड्यापर्यंत राज्यात हिमस्खलनाचा इशारा जारी करण्यात आला आहे.

पर्वतांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम मैदानी भागातही दिसून येत आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारसह इतर राज्यांमध्ये पुन्हा थंडी आणि धुके वाढले आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये गुरुवारी सकाळी पाऊस पडला. यापूर्वी बुधवारी अयोध्या आणि लखनौसह नऊ शहरांमध्ये पाऊस पडला होता. बिहारमधील पाच जिह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात तापमानात घट झाल्याने थंडी आणखी वाढेल, असा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. बिहारमधील भागलपूर हा 7.4 अंश सेल्सिअस तापमानासह सर्वात थंड जिल्हा होता. दरम्यान, 31 जानेवारीपासून राजस्थान आणि मध्य प्रदेशात वादळ आणि पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.