मार्च महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणुकीत मोठी घट
पहिल्या तिमाहीत गुंतवणूक दमदार, मार्चमध्ये घटली : कमोडिटी ईटीएफचीही नकारात्मक कामगिरी
वृत्तसंस्था/मुंबई
मागच्या मार्च महिन्यामध्ये पाहता गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणुकीमध्ये मोठी घट दिसून आली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यामध्ये 57 टक्के गुंतवणूक घटली आहे. याचदरम्यान कमोडिटी ईटीएफमध्येदेखील गुंतवणूक कमी झाली. पण पहिल्या तिमाहीत गोल्ड ईटीएफमध्ये चांगली गुंतवणूक राहिलेली दिसून आली आहे.
गोल्ड ईटीएफमध्ये 2265 कोटी रुपये घातले गेले आहेत. या मागच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये 5254 कोटी रुपयांची गुंतवणूक गोल्ड ईटीएफमध्ये करण्यात आली होती. सिल्वर ईटीएफमधून सलग दुसऱ्या महिन्यामध्ये गुंतवणूकदारांनी आपले पैसे काढून घेतले असल्याचेही याच संस्थेच्या माहितीमध्ये देण्यात आले आहे. पाच महिन्यांमध्ये सिल्वर ईटीएफमधून 683 कोटी रुपये काढून घेण्यात आले असून याच्या मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीत 826 कोटी रुपये काढण्यात आले होते.
कमोडिटी ईटीएफची कामगिरी
मार्च महिन्यामध्ये कमोडिटी आधारावर ईटीएफमध्ये देखील कमकुवतता दिसून आली. या ईटीएफमध्ये जवळपास पंधरा टक्के गुंतवणूक घटलेली दिसून आली. 43 कमोडिटी ईटीएफमध्ये सर्व कमोडिटीजने नकारात्मक परतावा दिला आहे. यामध्ये यूटीआय सिल्वर ईटीएफने 14 टक्के, डीएसपी सिल्वर ईटीएफने 13 टक्के, आदित्य बिर्ला एसएल सिल्वर ईटीएफने 13 टक्के आणि एचडीएफसी सिल्वरने गुंतवणूक परताव्यामध्ये 13 टक्के घसरण नोंदवली आहे.
पहिल्या तिमाहीत 31 हजार कोटींची गुंतवणूक
2026 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी-मार्च कालावधीत गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडस् (गोल्ड ईटीएफ) मध्ये एकंदर 31,561 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ही गुंतवणूक डिसेंबर 2025 तिमाहीच्या तुलनेत 36 टक्के अधिक आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत गोल्ड ईटीएफमध्ये 23,132 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. 2025 च्या पहिल्या तिमाहीत ही गुंतवणूक 5654 कोटींची गुंतवणूक झाली होती. त्या तुलनेत सहापट गुंतवणूक वाढली आहे.
वर्षभरात 54 लाख नवी खाती
भूगर्भीय राजकीय तणाव व बाजारातील चढ-उतार पाहता सुरक्षित संपत्तीच्या रुपात सोन्यावर जास्त विश्वास व्यक्त केला जात आहे. मार्चमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांची मार्च 2025 मध्ये संख्या 69.69 लाख होती जी मार्च 2026 मध्ये वाढत 1.24 कोटींवर पोहचली आहे. म्हणजेच वर्षभरात 54.28 लाख नवी खाती उघडण्यात आल्याचे स्पष्ट होते.