मेरशी सर्कलजवळील सिग्नल काढून उड्डाणपूल उभारावा
मेरशी पंचायतीच्या ग्रामसभेत ठरात सर्वांनुमते संमत : फक्त 15 सेकंदाचा अवधी अन्यायकारक
त. भा. प्रतिनिधी
पणजी : मेरशी सर्कलजवळील सिग्नल काढून टाका आणि तेथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी करणारा ठराव मेरशी पंचायतीच्या ग्रामसभेत सर्वांनुमते मंजूर करण्यात आला आहे. तेथे सिग्नलमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे ग्रामसभेतून निदर्शनास आणण्यात आले. शिवाय फक्त 15 सेकंदाचा अवधी मेरशीतील वाहनांसाठी पणजीकडे जाण्याकरीता सिग्नलातून देण्यात येतो, असेही स्पष्ट करण्यात आले.
पणजी शहरातून मडगांव - वास्को तसेच मेरशी येथे जाताना सर्कलकडे दररोज वाहनांची कोंडी होते. मेरशीतील वाहन चालकांना त्याचा मोठा फटका बसतो. वाहने खोळंबून राहतात आणि गर्दीच्या वेळी तर मोठी कोंडी होते. सिग्नल असूनही ती कोंडी सुटत नाही उलट वाढते. अशी माहिती सभेतून देण्यात आली.
मेरशीतून येणाऱ्या वाहनांसाठी 15 सेकंदाचा सिग्नल म्हणजे अन्याय असून तो वेळ वाढवण्याची गरज आहे किंवा तो सिग्नलच काढा आणि वाहतूक पोलिस नेमा, असेही सूचवण्यात आले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रुग्णवाहिका या कोंडीत अडकून पडतात. त्यामुळे त्यांना गोमेकॉत पोहोचण्यास उशीर लागतो. मेरशीतील वाहनचालकांना सर्कलजवळील वाहतूक कोंडीस दरदिवशी सकाळ - संध्याकाळी आणि दिवसा इतर वेळीही सदर कोंडीला तोंड द्यावे लागते. त्यातून कायमची सुटका होण्यासाठी एक तर सिग्नल काढू टाका आणि उड्डाणपूलाची उभारणी करा, असा ठराव संमत झाला आहे. उपस्थित ग्रामस्थांनी त्यास एकमताने पाठिंबा दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.