For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हजगोळी परिसरात वाघाचे दर्शन

10:01 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
हजगोळी परिसरात वाघाचे दर्शन
Advertisement

शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

Advertisement

वार्ताहर /तुडये

हजगोळी ता. चंदगड येथील मडवळ कोंड परिसरात वाघ दिसल्याने भीती निर्माण झाली आहे. मागील दोन दिवस याच परिसरामध्ये प्रवाशांना व शेतकऱ्यांना दर्शन झाल्याने येथील नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तुडयेचे सरपंच विलास सुतार यांना रात्री 11 च्या सुमारास मडवळ कोंड येथील रस्त्यावर वाघाचे दर्शन झाले. चंदगडवरून रात्री उशिरा येत असताना भर रस्त्यावर वाघ त्यांच्या नजरेस पडला. दुसऱ्या दिवशी या परिसराला लागून असलेल्या भैरू मुतकेकर यांच्या शेतातील घराजवळ वाघ येऊन उभा राहिला. मध्यरात्री एकच्या सुमारास वाघ मुतकेकर यांच्या घराजवळ आल्याने त्यांची तारांबळ उडाली. अनेक शेतकऱ्यांची याठिकाणी शेती आहे. वन्यप्राण्यांकडून सतत पिकांचे नुकसान होत असते म्हणून येथील शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांच्या राखणीसाठी शेतात जात असतात. तसेच ज्या ठिकाणी वाघाचा सध्या वावर आहे त्याच्याही पुढे घनदाट जंगलाला लागून शेतकऱ्यांच्या काजू बागा आहेत. शेतकऱ्यांना उशिरापर्यंत बागेत रहावे लागते. यामुळे काजू उत्पादकांमध्येही भीती निर्माण झाली आहे. तरी वन खात्याने सदर बाब गांभीर्याने घेऊन वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी हजगोळी येथील नागरिक करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.