For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीमेन्स कंपनीच्या सीईओंचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

06:55 AM Apr 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
सीमेन्स कंपनीच्या सीईओंचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
Advertisement

अमेरिकेतील दुर्घटनेत पत्नीसह तीन मुलांचाही दुर्दैवी अंत : स्पेनमधून पर्यटनासाठी अमेरिकेत गेले असता दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे गुरुवारी एक हेलिकॉप्टर हडसन नदीत कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या सर्व 6 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये अभियांत्रिकी कंपनी ‘सीमेन्स’चे सीईओ ऑगस्टीन एस्कोबार, त्यांची पत्नी मर्स कॅम्परुबी आणि त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे. तसेच हेलिकॉप्टरमधील 36 वर्षीय पायलटही ठार झाला. पायलटचे नाव अद्याप उघड झालेले नाही. प्रथमदर्शनी तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे दिसून येत असून याबाबत अधिक तपास केला जात आहे.

Advertisement

न्यूयॉर्क सिटी अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, अपघातापूर्वी बेल 206 हेलिकॉप्टरचे दोन तुकडे झाले. त्याची शेपटी आणि रोटर ब्लेड मुख्य भागापासून वेगळे झाले होते. आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी नदीतून सर्व प्रवाशांना बाहेर काढले. त्यापैकी चौघांना जागीच मृत घोषित करण्यात आले, तर दोघांचा रुग्णालयात पोहोचल्यानंतर मृत्यू झाला. सीईओ ऑगस्टीन एस्कोबार यांच्यासोबत त्यांच्या 4, 5 आणि 11 वर्षीय मुलांचाही दुर्दैवी अंत झाला आहे. एस्कोबार यांचे कुटुंब मूळचे स्पेनचे आहे. ते न्यूयॉर्कमध्ये हेलिकॉप्टरने पर्यटनासाठी गेले होते.

उड्डाणानंतर 15 मिनिटांनी दुर्घटना

हेलिकॉप्टरने स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता उ•ाण केले. त्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजवर पोहोचल्यानंतर हेलिकॉप्टर हळुहळू खाली उतरू लागले आणि दुपारी 3.15 वाजता लोअर मॅनहॅटनमधील हडसन नदीपात्रात कोसळले. या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सदर व्हिडिओंमध्ये हेलिकॉप्टरचे शेपूट आणि रोटर अपघातापूर्वी विभक्त झालेले दिसत आहेत.

बेल 206 हेलिकॉप्टरची कॅनडाच्या कंपनीकडून निर्मिती

बेल 206 ही ट्विन-ब्लेड हेलिकॉप्टरची मालिका असून ती सिंगल-इंजिन आणि ट्विन-इंजिन अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. हे हेलिकॉप्टर कॅनडातील क्यूबेकमधील मिराबेल येथील बेल हेलिकॉप्टर कंपनीने बनवले आहे. बेल 206एल मॉडेलमध्ये सहा लोक बसू शकतात. या हेलिकॉप्टरचा वापर अग्निशामक आणि व्यवस्थापनाशी संबंधित विविध कामांसाठी देखील केला जातो.

अपघाताचा व्हिडिओ खूपच भयानक : ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल पोस्टमध्ये हेलिकॉप्टर अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. ‘नदीपात्रात कोसळलेल्या हेलिकॉप्टर अपघाताचा व्हिडिओ खूपच भयानक आहे. देव पीडितांच्या कुटुंबीयांना आणि आप्तांना शक्ती देवो’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. वाहतूक सचिव शॉन डफी आणि त्यांची टीम या प्रकरणाची चौकशी करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दोन दशकांतील तिसरा प्राणघातक अपघात

शुक्रवारी झालेला हा हेलिकॉप्टर अपघात गेल्या 20 वर्षात न्यूयॉर्कच्या हेलिकॉप्टर टूर उद्योगातील तिसरा मोठा अपघात आहे. 2009 मध्ये इटालियन लोकांना पर्यटनासाठी घेऊन जाणाऱ्या एका हेलिकॉप्टरची हडसन नदीवर एका खासगी विमानाशी टक्कर झाली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. तर 2018 मध्ये एक ओपन-डोअर टुरिस्ट हेलिकॉप्टर ईस्ट रिव्हरमध्ये कोसळले. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. त्यात फक्त पायलट बचावला होता. 1977 पासून न्यूयॉर्क शहरात हेलिकॉप्टर अपघातात 32 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Advertisement
Tags :

.