मुख्यमंत्रिपदाची हमी मिळाल्यास सिद्धू राजकारणात
पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी केले स्पष्ट
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाब विधानसभा निवडणुकीला अद्याप वर्षाहून अधिक कालावधी आहे, परंतु तेथील राजकारण आतापासूनच तापू लागले आहे. माजी कॅबिनेट मंत्री आणि पंजाब काँग्रेसच्या नेत्या नवज्योत कौर सिद्धू यांनी माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्या राजकारणातील वापसीवरून वक्तव्य केले आहे. एखाद्या पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले तरच नवज्योत सिंह सिद्धू राजकारणात परततील असे त्यांच्या पत्नीने सांगितले आहे.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरण्यासाठी 500 कोटी रुपये द्यावे लागतात, तर आमच्याकडे कुणाला देण्यासाठी इतकी रक्कम नाही. आम्ही पैसे देऊ शकत नाही, परंतु योग्य निकाल मिळवून देऊ शकतो. सिद्धू हे काँग्रेसशी संबंधित आहेत, खासकरून प्रियांका वड्रा यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. परंतु काँग्रेसमध्ये यापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचे 5 दावेदार असून पक्षातील चढाओढ टोकाला पोहोचली असल्याचा दावा नवज्योत कौर सिद्धू यांनी केला.
सिद्धू हे राजकारणात पैशांसाठी आलेले नाहीत, तर काम करण्यासाठी आहेत, जर कुठल्या पक्षाने त्यांना पंजाब सुधारण्याची शक्ती दिली तर ते पंजाबला गोल्डन स्टेट करतील असे वक्तव्य त्यांच्या पत्नीने केले आहे. कौर यांच्या या वक्तव्यानंतर सिद्धू हे 2027 पूर्वी मोठे पाऊल उचलू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.