सिद्धिमहात्म्य
अध्याय सातवा
समाधीमार्गाने बाप्पांची म्हणजे ईश्वराची उपासना करणे ज्या भक्तांना जमत नाही त्यांच्यासाठी बाप्पांनी त्यांचे पूजन करून त्यांना प्रसन्न करून घेण्याचा मार्ग सांगितला आहे. षोडशोपचारे केलेली पूजा, मिळेल ते साहित्य घेऊन केलेली पूजा अथवा मानसपूजा या पूजेच्या तिन्ही प्रकारांपैकी कोणत्याही पद्धतीने केलेली पूजा बाप्पांना आवडते. ते भक्तावर प्रसन्न होऊन त्याचे मनोरथ पुरवतात मग तो कुठल्याही आश्रमातला असो. जे निरपेक्षतेने भक्ती करतात त्यांना ते सिद्धी प्रदान करतात असं सांगणारा ‘ब्रह्मचारी गृहस्थो वा वानप्रस्थो यतिश्च य। एकां पूजां प्रकुर्वाणो, प्यन्यो वा सिद्धिमृच्छति 11’ या श्लोकाचा आपण अभ्यास करत आहोत.
भक्तांच्या हिताच्या असलेल्या मागण्या पुरवण्यात बाप्पा तत्पर असतात. अशा मागण्या पुरवण्यामागे त्यांचा कोणता हेतू असतो हेही आपण समजून घेतलं. पण प्रपंचातील किंवा लौकिकातील कितीही मागण्या बाप्पांनी पुरवल्या तरी भक्तांचं समाधान होत नाही. तसंच बाप्पांनी पुरवलेल्या मागण्या कधी ना कधी नाश पावणाऱ्या आहेत हे भक्तांच्या लक्षात आलं की, भक्त आपोआपच निरिच्छ होतो. त्यातच बाप्पांच्या अफाट दातृत्व शक्तीची जाणीव त्याला होते आणि त्यांच्या त्या शक्तीपुढं आपल्या मागण्या म्हणजे किस झाड की पत्तीच्या स्वरूपातल्या आहेत हे लक्षात येतं. पुढं पुढं तर तो बाप्पांना, काहीही न मागता मनोभावे कृतज्ञ भावाने नमस्कार करतो कारण त्याला खात्री असते की, आपण काही न मागताच आपल्या हिताची गोष्ट बाप्पा आपणहूनच आपल्याला देत राहणार आहेत मग वेगळं मागणं असं मागायचं काही कारणच उरत नाही. असा निरिच्छ झालेला भक्त आणखीनच प्रेमाने, शक्य असेल त्या मार्गाने बाप्पांची पूजा करतो. बाप्पा त्याच्यावर अतिप्रसन्न होतात. त्याला समाधीमार्गाकडे वळवून ईश्वराची उपासना करायची बुद्धी देतात. समाधी म्हणजे काय याची आपल्यास उत्सुकता असते. त्याबद्दल श्रीगोंदवलेकर महाराज काय सांगतात ते लक्षात घेतलं तर समाधी म्हणजे काय ते आपोआप उलगडतं. ते म्हणतात, प्रपंच, प्रारब्ध आणि उपाधी यातून जो मुक्त होतो तो नेहमीच समाधीत असतो. वरील तिन्ही गोष्टीबद्दल मनुष्य जेव्हा काळजी करायचं बंद करेल तेव्हा तो त्यापासून मुक्त होतो. अशा कायम समाधी अवस्थेत असलेल्या भक्ताला बाप्पा अष्टसिद्धी प्रदान करतात. त्याला सिद्धी प्रदान करण्यामागे बाप्पांचा उद्देश असा असतो की, त्यानं त्या सिद्धींचा उपयोग करून लोककल्याणकारी कार्ये करावीत. अशा लीला करणं हे बाप्पांनी प्रदान केलेल्या सिद्धींमुळे भक्तालाही शक्य होतं. अर्थात असे भक्त त्यांना प्राप्त झालेल्या सिद्धी स्वत:च्या भल्यासाठी किंवा फायद्यासाठी कधीही वापरत नाहीत. सिद्धीबद्दल जाणून घेण्याची सगळ्यांना बरीच उत्सुकता असते म्हणून त्याविषयी थोडी चर्चा करू.
मार्कंडेय पुराणात आठ सिद्धींचे वर्णन केलेले आहे. कठोर उपासनेमुळे व विशिष्ट प्रकारच्या आचरणाने त्या प्राप्त होतात. ‘अणिमा महिमा चैव लघिमा गरिमा तथा। प्राप्ति प्राकाम्यमीशित्वं वशित्वं चाष्ट सिद्धय’. अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य आणि ईशित्व वशित्वं या आठ सिद्धी आहेत. सिद्धी या शब्दाचा अर्थ आहे- पूर्णता, प्राप्ति, सफलता इ. असामान्य कौशल्य, असामान्य क्षमता अर्जित करण्यास सिद्धी असे म्हटले गेले आहे. उदाहरणादाखल पहावयाचे झाल्यास दिव्यदृष्टी, एकाच वेळेस दोन जागी असणे, आपल्या आकारास सूक्ष्म अथवा मोठे करणे इ. पातंजल योगशास्त्रात-जन्माने,औषधिद्वारा, मत्राद्वारा, तपाने व समाधीने सिद्धींची प्राप्ती केली जाते असे म्हटले आहे. मुख्य सिद्धी आठ प्रकारच्या आहेत.
क्रमश: