सिद्धार्थ गाडेकर, डोल्माची चमक
वृत्तसंस्था / गुलमांग
येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राच्या सिद्धार्थ गाडेकर आणि हिमाचल प्रदेशच्या टेनझीन डोल्माने शानदार कामगिरी केली. या स्पर्धेतील विद्यमान विजेत्या भारतीय सेनादलाने आपली विजय घोडदौड कायम राखताना मंगळवारी 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 4 पदकांची कमाई केली आहे.
पदक तक्त्यामध्ये भारतीय सेनादल संघाने आघाडीचे स्थान मिळविले असून त्यांनी एकूण चार सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण 13 पदके घेतली आहेत. या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात लडाखला मंगळवारी पदक तक्त्यात आपले खाते उघडता आलेले नाही. पण ते या तक्त्यामध्ये सात पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्रने तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्य पदकांसह तिसरे स्थान घेतले आहे.
हिमाचलप्रदेशच्या 4 वर्षीय टेनझीन डोल्माने 13.07.41 कालावधी नोंदवित सुवर्णपदक मिळविले. हिमाचलप्रदेशच्या नथाशा मेहरने रौप्य तर उत्तराखंडच्या मेनका गुंजीयाळने कांस्यपदक घेतले. पुरुषांच्या स्काय माऊंटनिंग व्हर्टिकल प्रकारात महाराष्ट्राच्या सिद्धार्थ गाडेकरने सुवर्ण, उत्तराखंडच्या शार्दुल टी.ने रौप्य आणि उत्तराखंडच्या हिमांशु सिंगने कांस्यपदक घेतले. महिलांच्या विभागात हिमाचल प्रदेशच्या डोल्माने सुवर्ण, नताशा मेहरने रौप्य आणि गुंजीयाळने कांस्य पदक पटकाविले.