सिद्धार्थ अन् मितालीचा चित्रपट लवकरच
नवरा-बायको पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्याकडे मराठी कलाविश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहिले जाते. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे एकमेकांना डेट केल्यावर 2021 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. ही रोमँटिक जोडी ऑनस्क्रीन केव्हा एकत्र झळकणार याची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर नव्या वर्षात दोघांनी त्यांच्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
सिद्धार्थ अन् मितील हे हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात एकत्र दिसून येणार ओत. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिश दुधाडे, राजन भिसे आणि राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
फसक्लास दाभाडे चित्रपटातील ‘दिस सरले’ हे गाणे सादर करण्यात आले आहे. रुखवत तयार करण्यापासून नवरीच्या पाठवणीपर्यंत प्रत्येक प्रसंग या गाण्यात उत्कृष्टपणे मांडण्यात आले आहेत. यात मितालीची झलक प्रेक्षकांना पाहता येणार आहे. अमितराज यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे. हा चित्रपट 24 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. याची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल. राय आणि क्षिती जोग यांनी केली आहे.