‘परम सुंदरी’मध्ये सिद्धार्थ अन् जान्हवी
पहिले पोस्टर सादर
दिनेश विजान यांनी स्वत:चा आगामी चित्रपट परम सुंदरीची घोषणा केली आहे. या रोमँटिक चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे. दोघांचाही पहिला लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पहिल्यांदाच सिद्धार्थ आणि जान्हवीची जोडी पाहता येणार आहे.
इन्स्टाग्रामवर निर्मात्यांकडून परम सुंदरीचे पोस्टर आणि मोशन पोस्टर जारी करण्यात आले आहे. मोशन पोस्टरमध्ये सिद्धार्थने जान्हवीला उचलून घेतल्याचे आणि दोघेही दाक्षिणात्य वेशभूषेत असल्याचे दिसून येते. ‘नॉर्थ का स्वॅग, साउथ का ग्रेस..., दो दुनिया टकराती हैं और चिंगारियां उठती है’ अशी कॅप्शन निर्मात्यांनी दिली आहे.
जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्राचे चित्रपटातील वेगवेगळे पोस्टरही जारी करण्यात आले आहे. नदीकाठावर बसलेली जान्हवी यात अत्यंत सुंदर दिसून येत आहे. उत्तरेकडील युवक आणि दक्षिणेकडील सुंदरीचीही प्रेमकहाणी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान करत आहेत. तर दिग्दर्शन तुषार जलोटा करत आहेत. 25 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.