पाणी सोडण्यासाठी सिद्धरामय्यांचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र
उत्तर कर्नाटकातील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी प्रयत्न
प्रतिनिधी/ बेंगळूर
उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी कोयना आणि उजनी जलाशयातून कृष्णा आणि भीमा नद्यांमध्ये पाणी सोडण्याची विनंती कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, बागलकोट, कलबुर्गी, यादगीर आणि रायचूर या जिल्ह्यांना मार्च 2025 च्या सुऊवातीपासूनच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात महाराष्ट्र सरकारच्या मदतीची गरज असल्याचे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. नागरिकांना आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी यापूर्वी कृष्णा नदीत पाणी सोडल्याबद्दल तसेच विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानत असल्याचा उल्लेखही सिद्धरामय्यांनी पत्रामध्ये केला आहे.
पावसाळा सुरु होईपर्यंत हिप्परगी बॅरेज, स्थानिक जलाशयांमधील पाणीसाठा उत्तर कर्नाटकाच्या कृष्णा खोऱ्यातील जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी पुरेसा नाही. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर कर्नाटकातील लोकांना व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी कोयना जलाशयातून कृष्णा नदीपात्रात किमान 2 टीएमसी आणि उजनी जलाशयातून भीमा नदीपात्रात 1 टीएमसी पाणी सोडण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे