सिद्धयरामय्या उद्या पंतप्रधानांना भेटणार
मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर : केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेणार
बेंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या गुरुवारी तीन दिवसांच्या नवी दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. शनिवार 29 जून रोजी सकाळी 8 वाजता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्याचप्रमाणे ते काही केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार असून राज्यातील विविध योजना मार्गी लावण्याची विनंती करतील. गुरुवारी दुपारी नवी दिल्लीला रवाना झालेल्या सिद्धरामय्या यांनी सायंकाळी तेथील एका हॉटेलमध्ये राज्यातील लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्र्यांची सौहार्दपूर्ण बैठक घेतली. शुक्रवारी ते अनेक केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील योजनांविषयी निवेदन देण्याची शक्यता आहे.
केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री, रेल्वेमंत्री, पाणीपुरवठा, गृह आणि अर्थमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी बेंगळूरमध्ये केंपेगौडा जयंती कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी अद्याप वेळ निश्चित झालेली नाही. भेटीसाठी लवकरच वेळ निश्चित होऊ शकेल. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी भेटीसाठी वेळ निश्चित केली आहे. राज्यात व्हावयाच्या विकासकामांची यादी पाठवून देण्यात आली आहे. नव्या सरकारकडून मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात कर्नाटकासाठी अपेक्षित असणाऱ्या कामांची यादी राज्याच्या महसूलमंत्र्यांनी सादर केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधी जनतेच्यावतीने आवाज उठवणार
राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच लोकसभा अध्यक्षांची एकत्रितपणे भेट घेतल्याविषयी प्रतिक्रिया देताना सिद्धरामय्या म्हणाले, पंतप्रधान आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सभापतींना त्यांच्या आसनापर्यंत नेऊन शुभेच्छा देण्याची परंपरा सुरुवातीपासूनच आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत. राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून संपूर्ण देशभर प्रवास केला आहे. त्यांना देशाच्या सदस्यांची जाणील आहे. या समस्या मांडून ते लोकसभेमध्ये जनतेच्यावतीने आवाज उठवतील. ते आपल्या पदाची जबाबदारी समर्थपणे निभावतील, असा विश्वासही सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.