For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यातील विविध योजनांच्या मंजुरीसाठी सिद्धयरामय्यांची नितीन गडकरींना विनंती

06:49 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्यातील विविध योजनांच्या मंजुरीसाठी सिद्धयरामय्यांची नितीन गडकरींना विनंती
Advertisement

बेंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बेळगावमधील राष्ट्रीय महामार्ग-4 वर फ्लायओव्हर निर्माण करण्यास मंजुरी देण्याची विनंती केली. गोकाक फॉल्स येथे केबल कार सुविधा निर्माण करण्याची योजना, कित्तूरहून बैलहोंगलला संपर्क साधणाऱ्या रस्त्याच्या विकासाला मंजुरी, संकेश्वरपासून गोकाक-यरगट्टी-मुनवळ्ळीमार्गे नरगुंदला जोडणाऱ्या 127 कि. मी. लांबीच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची विनंतीही सिद्धरामय्या यांनी गडकरींकडे केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे गुरुवारपासून तीन दिवसांच्या नवी दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन राज्यातील विविध राष्ट्रीय महामार्गांचा विकास आणि इतर प्रमुख योजनांविषयी चर्चा केली. तसेच केंद्र सरकारला सादर केलेल्या विविध प्रस्तावांना त्वरित मंजुरी मिळवून द्यावी, असे निवेदन दिले.

Advertisement

बेळगाव-हुनगुंद-रायचूर (एनएच 748 ए), बेंगळूर-चेन्नई महामार्ग, सुरत-चेन्नई महामार्ग, बेंगळूर उपनगरीय रिंगरोड ग्रीनफिल्ड कॉरिडॉर विकासाला मंजुरी दिल्याबद्दल सिद्धरामय्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राज्यात 5,225 कि. मी. लांबीचे 39 तत्वत: मंजुरी मिळालेल्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषणा करण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यावर त्वरित कार्यवाही करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली. शिराडी घाटात मारनहळ्ळीपासून आ•होळेपर्यंत भुयारी मार्ग निर्माण करून मंगळूर बंदराशी संपर्क सुलभ करण्यासाठी प्रयत्न करावेत. म्हैसूर शहरातील मणिपाल हॉस्पिटल जंक्शन येथे फ्लायओव्हर निर्मितीसाठी मंजुरी द्यावी. म्हैसूर रिंगरोड व ‘एनएच-275 के’वर 9 ग्रेड सेपरेटर निर्माण करण्यास मंजुरी द्यावी, अशी विनंती केली.

राष्ट्रीय महामार्ग एनएच-766 वर 106 कि. मी. चौपदरीकरण रस्त्याचे सहापदरीकरण करणे, नुकतीच मंजुरी मिळालेल्या केरळच्या कल्पेटपासून मानंदवाडी, एच. डी. कोटे, जयपूरमार्गे म्हैसूरशी संपर्क साधणाऱ्या 90 कि. मी. मार्ग, म्हैसूरपासून बन्नूरमार्गे मळवळ्ळीला जोडणारा 45 कि. मी. लांबीचा महामार्गाचा विकास करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री के. जे. जॉर्ज, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव गोविंदराजू, राज्य सरकारचे दिल्लीतील प्रतिनिधी टी. बी. जयचंद्र, सरकारचे मुख्य सचिव रजनीश गोयल, अप्पर मुख्य सचिव एल. के. अतिक, शालिनी रजनीश, के. व्ही. त्रिलोकचंद्र आदी उपस्थित होते.

Advertisement

प्रस्ताव...

  • राष्ट्रीय महामार्ग-4 वर फ्लायओव्हर
  • गोकाक फॉल्स येथे केबल कार सुविधा
  • कित्तूरहून बैलहोंगलला संपर्क साधणाऱ्या रस्त्याचा विकास
  • संकेश्वरपासून गोकाक-यरगट्टी-मुनवळ्ळीमार्गे नरगुंदला जोडणाऱ्या 127 कि. मी. लांबीच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा

Advertisement
Tags :

.