सिद्धरामय्यांचे आता तळ्यामळ्यात
सरकार पातळीवर चर्चा करून हिजाब बंदीबाबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
हिजाबवरील बंदी मागे घेणार असल्याचे शुक्रवारी वक्तव्य केलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी युटर्न मारला आहे. हिजाबवर बंदी घालण्याबाबत विचार करण्यात आला असून याबाबत सरकारी पातळीवर चर्चा करून निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हैसूरमध्ये शनिवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, हिजाबवरील बंदी मागे घेण्यात आलेली नसून आम्ही त्यावर चर्चा करून निर्णय घेणार आहोत. शनिवारी म्हैसूर येथील एका कार्यक्रमात सहभागी होत असताना मला कोणीतरी विचारले की हिजाबवरील बंदी मागे घेणार का, पण मी फक्त त्यावर आम्ही विचार करू, असे त्यांनी स्पष्ट केले होते. हिजाबवरील बंदी मागे घेण्यात आलेली नाही. या शैक्षणिक वर्षात हिजाब बंदी मागे घेण्याबाबत शासन पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिजाब बंदी मागे घेण्याच्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हिजाब बंदी मागे घेण्यावर भाजप नेत्यांनी कडाडून विरोध केला असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा बचाव करत त्यांच्या समर्थनार्थ उभे राहिल्यामुळे राज्यात पुन्हा हिजाब समर्थक-विरोध संघर्ष सुरू झाला आहे.
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, बसवराज बोम्माई, प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र, विरोधी पक्षनेते आर. अशोक, माजी मंत्री सी. टी. रवि, आमदार बसनगौडा यत्नाळ-पाटील यांच्यासह भाजपच्या बहुतेक नेत्यांनी हिजाब बंदीच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर कडाडून टीका केली आहे. तसेच हिजाब बंदी वक्तव्य मागे न घेतल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. तर काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा बचाव करत असल्यामुळे हिजाबवरून आता पुन्हा काँग्रेस-भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होणार आहेत.
भाजपची टीका
सर्व जातींमध्ये धर्माचे विष पेरणे हे सिद्धरामय्यांची कायमची भूमिका आहे, अशी टीका राज्य भाजपने केली आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी शालेय मुलांसाठी गणवेश धोरण जारी करण्यात आले आहे. तसेच सुप्रीम कोर्टानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे, असे भाजपने ‘एक्स’मध्ये म्हटले आहे.