For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धरामय्या हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीत

06:38 AM Dec 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
सिद्धरामय्या हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीत
Advertisement

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीनंतर राहुल गांधीची भेट घेण्याची शक्यता

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

कर्नाटक काँग्रेसमधील मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा गोंधळ सध्या सुप्तावस्थेत असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या शुक्रवारी दिल्लीला रवाना झाले. शनिवारी ते पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे. मंगळवारी नवी दिल्लीला गेलेले उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार वरिष्ठांच्या भेटीशिवाय रिकाम्या हाती परतले होते. असे असतानाच पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने दिल्लीला गेलेले सिद्धरामय्या पक्षश्रेष्ठींची भेट घेत असल्याने चर्चेला उत आला आहे.

Advertisement

राज्यात महिनाभरापासून सत्तावाटप व अधिकार हस्तांतरावरून चर्चा सुरू आहे. वरिष्ठांच्या सूचनेवरून मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या गोंधळावर सिद्धरामय्या व डी. पे. शिवकुमार यांनी परस्परांशी चर्चा करून पडदा टाकला होता. हा गेंधळ मिटल्याचे दिसत असले तरी दोन्ही नेत्यांकडून आपल्या परीने मोर्चेबांधणी सुरू आहे. परंतु, राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या मुद्द्याबाबत काँग्रेसश्रेष्ठींनी फारसा रस दाखविलेला नाही. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसमधील राजकीय परिस्थिती सध्या शांत आहे.

नवी दिल्ली येथे शनिवारी होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सिद्धरामय्या शुक्रवारी बेंगळूरहून रवाना झाले. या बैठकीनंतर सिद्धरामय्या हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. राज्य काँग्रेसमधील राजकीय घडामोडींवर ते राहुल गांधींशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ पुनर्रचनेवरही ते चर्चा करण्याची शक्यता आहे.

बेळगावमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांनी राज्यात नेतृत्व बदल होणार नसल्याचे हायकमांडने सांगितल्याचे वक्तव्य केले होते. सिद्धरामय्यांनी देखील मीच पूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्रिपदावर राहणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर गटबाजीच्या राजकारणाला उत आला होता. दोन्ही गटातील आमदारांनी उघडपणे वक्तव्ये केल्याने सत्तावाटपाचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला होता.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांड सिद्धरामय्या व शिवकुमार यांना दिल्लीला बोलावून वादावर तोडगा काढण्यासाठी फॉर्म्युला तयार करणार असल्याचे सांगितले जात होते. तथापि, दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अधिकार हस्तांतराच्या मुद्द्याबाबत हायकमांड हस्तक्षेप करणार नाही. ही स्थानिक पातळीवर निर्माण झालेली समस्या आहे. स्थानिक नेत्यांनीच ती सोडवावी, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे काँग्रेसश्रेष्ठींची नेमकी भूमिका काय, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

याच दरम्यान, दिल्लीहून बेंगळूरला परतलेल्या शिवकुमार यांनी खर्गेंची त्यांच्या बेंगळुरातील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. आपण पक्षातील सर्व कामे केली आहेत. व्यासपीठावर भाषण देण्यापुरते मर्यादित न राहता पक्षासाठी सर्वकाही केल्याचे सांगितले होते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी आपले प्रयत्न थांबविले नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले होते.

या घडामोडींदरम्यान शनिवारी सिद्धरामय्या हे राहुल गांधीची भेट घेऊन अधिकार हस्तांतराचा गोंधळ दूर करण्याबरोबरच मंत्रिमंडळ पुनर्रचनेला हिरवा कंदील मिळविण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.