For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धरामय्या, शिवकुमार दिल्ली दौऱ्यावर

06:17 AM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिद्धरामय्या  शिवकुमार दिल्ली दौऱ्यावर
Advertisement

हायकमांडकडून निमंत्रण : राज्यातील राजकीय घडामोडींसह मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत आज चर्चा

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर :

Advertisement

राज्य राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा कुतूहल निर्माण झाले असून काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि सिद्धरामय्या यांनी दिल्लीभेटीचे निमंत्रण दिले आहे. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवरून दोन्ही नेत्यांनी सोमवारी रात्री दिल्लीला प्रस्थान केले. त्यांच्यापाठोपाठ काही मंत्र्यांनीही दिल्लीला धाव घेतल्याचे सूत्रांकडून समजते. मंत्रिमंडळ पुनर्रचना, राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवड आणि राज्यातील राजकीय घडामोडींविषयी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील.

मुख्यमंत्री बदल, मंत्रिमंडळ पुनर्रचना व पक्षांतर्गत अलीकडे घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्य काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती आहे. यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस हायकमांड मंगळवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना दिल्लीला येण्याची सूचना वरिष्ठांनी केली आहे. चर्चेतून सर्व बाबींवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. दोघांनाही दिल्लीला बोलावण्यात आले असले तरी ते वेगवेगळ्या विमानाने रवाना झाले.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि वरिष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी हे मंगळवारी सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यांच्याशी चर्चेनंतर राज्य काँग्रेसमधील गोंधळ दूर होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी हे डी. के. शिवकुमार यांच्याशीही चर्चा करतील. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात सुरू असलेले राजकीय मुद्दे या बैठकांचा मुख्य अजेंडा असण्याची शक्यता आहे.

रविवारी बेंगळूरमध्ये एसआयआर संदर्भात काँग्रेसने आयोजिलेल्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हायकमांडने फोन करून दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले होते. सिद्धरामय्या यांनीही दिल्लीला येणार असल्याचे कळविले होते. त्यापाठोपाठ सोमवारी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी डी. के. शिवकुमार यांना दिल्लीला येण्यास सांगितले.

सिद्धरामय्या यांच्या गटाने सिद्धरामय्या यांनाच पूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्रिपदी ठेवण्याची मागणी केली आहे. त्यासाठी सिद्धरामय्या यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या निकटवर्तीय मंत्र्यांसोबत चर्चाही केली होती. तर दुसरीकडे शिवकुमार यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री बदलाची मागणी केली आहे. त्यासाठी शिवकुमार यांनी मोर्चेबांधणीही केली आहे. त्यामुळे दिल्लीतील मंगळवारच्या घडामोडींविषयी तीव्र कुतूहल निर्माण झाले आहे.

मंत्रिमंडळ पुनर्रचनेला हिरवा कंदील मिळेल का?

पक्षश्रेष्ठी सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करून राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील राजकीय वाटचाल आणि सत्तावाटपातील गोंधळावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत. दुसरीकडे मागील वर्षभरापासून मंत्रिमंडळ पुनर्रचनेची मागणी होत आहे. त्यामुळे सिद्धरामय्या हे मंत्रिमंडळ पुनर्रचनेला वरिष्ठांकडून हिरवा कंदील मिळवतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

राज्यसभा निवडणुकीवरही चर्चा

मंगळवारच्या बैठकीत काँग्रेस नेते 18 जून रोजी होणारी राज्यसभेची निवडणूक आणि आगामी निवडणुकांवरही खलबते करणार आहे. राज्यसभा निवडणुकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना राज्यातून पुन्हा निवडून आणण्याबाबत चर्चा होईल, असे म्हटले जात आहे.

अनेक मंत्रीही दिल्लीला रवाना

दिल्ली दौरा हा केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांपुरता मर्यादीत नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, ग्रामविकास मंत्री प्रियांक खर्गे यांच्यासह इतर काही मंत्री देखील दिल्लीला रवाना झाल्याने उत्सुकता वाढली आहे.  मंत्री एच. के. पाटील, एच. सी. महादेवप्पा, भैरती सुरेश, के. जे. जॉर्ज आणि गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर हे देखील दिल्लीला गेल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे हे नेते दिल्लीत कोणाकोणाची भेट घेऊन चर्चा करतील, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.