For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धरामय्यांकडून नव्या राजकीय विक्रमाला गवसणी

06:55 AM Jan 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिद्धरामय्यांकडून नव्या राजकीय विक्रमाला गवसणी
Advertisement

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री बनण्याची कामगिरी : चाहत्यांकडून आज राज्यभरात विविध उपक्रम

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आज नवीन राजकीय टप्पा पार करतील. मंगळवार 6 जानेवारी रोजी ते कर्नाटकातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याच्या विक्रमाला गवसणी घालतील. राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू असतानाच सिद्धरामय्या यांच्या नावाने विक्रम प्रस्थापित होत आहे. पूर्ण कालावधीसाठी आपणच मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेस सरकारच्या उर्वरित कालावधीतही सिद्धरामय्याच मुख्यमंत्री पदावर राहतील का, हे काँग्रेसश्रेष्ठींच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे.

Advertisement

राज्याच्या राजकीय इतिहासात देवराज अर्स यांच्या नावाने सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा विक्रम होता. मंगळवारी सिद्धरामय्या या विक्रमाशी बरोबरी करतील. राज्यातील दीर्घकाळ मुख्यमंत्री म्हणून सेवा बजावल्याचा विक्रम आता सिद्धरामय्यांच्या नावाने नोंद होणार आहे. देवराज अर्स यांनी त्यांच्या दोन कार्यकाळात एकूण 2,794 दिवस मुख्यमंत्रिपद भूषविले होते. सिद्धरामय्यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात 5 वर्षे 4 दिवस आणि आता दुसऱ्या कार्यकाळात मुख्यमंत्री म्हणून 2 वर्षे 5 महिने पूर्ण केली आहेत. 6 जानेवारी रोजी ते मुख्यमंत्रिपदाचे 2,794 दिवस पूर्ण करतील. त्यामुळे राजकीयदृष्ट्या सिद्धरामय्या इतिहास घडवतील.

आज मंगळवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे म्हैसूरमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. राज्यातील प्रमुख नेते त्यांची भेट घेऊन सदिच्छाही व्यक्त करण्याची शक्यता आहे.

चाहत्यांकडून ‘नाटी कोळी’ उत्सव

सिद्धरामय्या हे राजकीयदृष्ट्या मैलाचा दगड पार करत असल्याने त्यांच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी राज्यभरात आनंदोत्सव, विविध मंदिरांमध्ये पूजा, सामाजिक कार्य, रक्तदान शिबिरे आणि सभांचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजकीय यशाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी चाहत्यांनी बेंगळूरच्या नेलमंगलजवळ ‘नाटी कोळी’ (गावठी कोंबडी) जेवणाचा बेत आखला आहे. त्याचप्रमाणे म्हैसूरमध्ये युवा काँग्रेस समितीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

राहुल गांधींशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार

राज्यात मुख्यमंत्रिपद हस्तांतरावरून वाद निर्माण झाल्याने मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा मुद्दा बाजूला पडला होता. आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याविषयी माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करेन, असे त्यांनी म्हटले आहे. बेंगळुरात सोमवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जानेवारी महिन्यात चर्चा करूया, असे राहुल गांधी यांनी मागील भेटीप्रसंगी सांगितले होते. त्यांनी भेटीसाठी वेळ दिल्यानंतर पुन्हा दिल्लीला जाईन. हायकमांडसोबत चर्चा केल्यानंतरच याबाबत निर्णय घेणार आहे. मकर संक्रांतीनंतर राज्य अर्थसंकल्पाची तयारी सुरू करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.