श्याम चुडीवाला
घरी मंगलकार्य ठरले की लगबग सुरू होते. स्त्रियांना सोहळ्याचे वेध लागतात. त्यात एक महत्त्वाचा मंगल प्रसंग असतो, तो म्हणजे सर्व सुवासिनींना बांगड्या भरण्याचा. बांगड्या भरणे हा एक उत्सवच असतो. काळ पुढे आपल्या गतीने गेला. स्त्रियांचे हात गरजेनुसार बांगड्यांविना ओकेबोके झाले. मनगटी घड्याळ व मनगटी बळ यांनी शोभू लागले. सणउत्सव मात्र याला अपवाद राहून बांगड्यांनी हात सजू लागले. रंगीबेरंगी वर्ख असलेल्या बांगड्या म्हणजे स्त्रियांच्या हृदयातला हळवा कप्पा आहे. नववधूचा साज म्हणजे भरगच्च भरलेला हिरवा चुडा. हा चुडा तिच्याशी हितगुज करतो. तिच्या कानात सृजनाचे गुपित सांगतो. बांगड्यांचं नातं अध्यात्मसृष्टीत सौभाग्यसुंदरतेने नटलेलं आहे.
महाभारतामध्ये युद्धप्रसंगी दहा दिवस झाले तरी काही निकाल लागेना तेव्हा दुर्योधन पितामह भीष्मांकडे गेला आणि त्यांच्याविषयी संदेह व्यक्त केला. कारण युधिष्ठिर आणि अर्जुनावर भीष्मांचे प्रेम होते. तेव्हा त्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या एक तर मी तरी राहीन किंवा पांडव तरी राहतील. भीष्मप्रतिज्ञाच ती! तेव्हा श्रीकृष्णाने हातामध्ये गच्च चुडा भरलेल्या द्रौपदीला भीष्मांकडे पाठवले. ते तेव्हा ध्यानस्थ होते. द्रौपदीने त्यांना नमस्कार करताना बांगड्यांचा नाद केला आणि ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’ असा आशीर्वाद मिळवला. अशीच कथा समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रात आहे. नाशिकला त्या काळातल्या प्रथेनुसार एक स्त्राr सती जात होती, तेव्हा श्री समर्थांची स्वारी गंगेवर ब्रह्मयज्ञ करीत होती. या तपस्वी पुरुषाचे दर्शन व आशीर्वाद घ्यावे म्हणून त्या साध्वीने कांकणभरल्या हातांनी समर्थांना नमस्कार केला आणि सौभाग्यवती हा आशीर्वाद घेतला. पुढे तिला दहा पुत्र होऊन त्यांचे आडनाव दशपुत्रे असे पडले. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, ‘शके बाराशते बारोत्तरे । तै टीका केली ज्ञानेश्वरे। सच्चिदानंद बाबा आदरे। लेखकु जाहला?’ श्री ज्ञानेश्वरीमध्ये चिरंजीव स्थान मिळवणाऱ्या सच्चिदानंदबाबांना माऊलींनी मृतावस्थेतून उठवले ते त्यांच्या पत्नी सौदामिनींनी माऊलींकडून प्राप्त केलेल्या ‘अखंड सौभाग्यवती भव’ या आशीर्वादाने. सती जाणाऱ्या सौदामिनीने गच्च भरलेल्या हिरव्या चुड्यासह माऊलींना साष्टांग दंडवत घातला तेव्हा माऊली म्हणाले, ‘आई, सत् चित् आनंदाला मरण माहीत नसतं’. सच्चिदानंदबाबांचे चरित्र संत दासगणू महाराजांनी लिहिले आहे. ते म्हणतात, सच्चिदानंद बाबांच्या तिरडीजवळ येऊन त्या प्रेतरूपी सच्चिदानंदास माऊली म्हणाले, ‘उठ सच्चिदानंदा या टाकून शीघ्र घोर निद्रेस । वेदा न करी खोटे ठायी नच संभवे तुझा नाश?’ माऊलींचा अमृतस्पर्श सच्चिदानंदबाबांना झाला. ते उठून बसले. माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली. तो वाग्यज्ञ लेखणीने अजरामर करण्याचे परमभाग्य सच्चिदानंदांना लाभले. बांगड्यांचा नाद हा मंगलसूचक आणि सौभाग्यवर्धक म्हणून ओळखला जातो.
शंभर वर्षांपूर्वीची सत्यकथा आहे. एका गावात मोठा भूकंप झाला. लोक सैरावैरा पळू लागले. एक बाई जिवाच्या आकांताने पळत होत्या. तेवढ्यात जमीन खचली आणि त्या गळ्यापर्यंत जमिनीमध्ये रुतल्या. जिवाच्या रक्षणासाठी त्यांचे दोन्ही हात अभावितपणे वर होते. भयामुळे त्यांची वाचा गेली. तोंडातून शब्द फुटेना. कुणाचे लक्षही जाईना तेव्हा त्यांनी बांगड्यांनी भरलेल्या हातांचा नाद केला आणि लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्या बांगड्यांच्या आवाजाने लोक धावले व त्यांचे प्राण वाचले. श्री दत्तप्रभूंनी चोवीस गुरूंमध्ये कुमारीच्या कांकणातील गुरुत्व समजावून सांगितले आहे. एका सुशील कन्येच्या वधूपरीक्षेसाठी मुलाकडची काही मोठी माणसे आली तेव्हा तिच्या घरातील सर्व मंडळी कुठेतरी बाहेरगावी गेली होती. त्यांच्या स्वागतासाठी, पाहुणचारासाठी तिने साळी कांडायला घेतल्या तर तिच्या हातातल्या कांकणांचा आवाज होऊ लागला. पाहुणे घरात असताना हा आवाज बरा नव्हे म्हणून तिने हातातली कांकणे काढून दोन दोनच कांकणे प्रत्येक हातात ठेवली. त्या दोन कांकणांचाही जेव्हा आवाज होऊ लागला तेव्हा एक एक कांकण काढून प्रत्येक हातात एक एकच कांकण ठेवले. तेव्हा आवाज थांबला आणि ती निश्चिंत मनाने साळी कांडू लागली. श्री दत्तप्रभू म्हणतात, ‘कलियुगात दोन माणसे जरी एकत्र आली तरी गप्पागोष्टी किंवा भांडणे वादविवाद होतातच. एकांतवासात साधकाची उपासना चांगली होते’. यात कांकणांचा नाद हा संगाशी जोडला आहे. संग हा प्रमादाचा जनक आहे, असे ज्ञान श्री दत्तप्रभूंना झाले.
पूर्वी स्त्रियांचे हात काचेच्या बांगड्यांनी सुशोभित असायचे. बांगडी सौभाग्याशी निगडित असल्याने त्यावर फार प्रेम आणि कोमल भावना स्त्रियांच्या जोडल्या होत्या. भारतात जेव्हा इंग्रजांचा प्रवेश झाला तेव्हा विदेशी बांगड्या बाजारात दिसू लागल्या, तेव्हा मात्र देशप्रेमी स्त्रियांनी भावना बाजूला ठेवल्या आणि हाताला दोरा बांधून इतर स्त्रियांना आवाहन केले की, ‘विदेशी बांगडी नको भरू ग हातात, अन्नान्न दशा चोहीकडे.’ ही बाणेदार स्त्राr संस्कृतीचे भूषण आहे. जुन्या काळातील प्रगल्भ स्त्रियांनी विठुराया आणि रुक्मिणी देवीला आपल्या मनोविश्वात जवळचे व हक्काचे स्थान दिले. त्या म्हणतात, विठुरायाची रुक्मिणी माहेरची श्रीमंत, परंतु सासर मिळाले ते जरा असेतसेच. विठुराया चोवीस तास भक्तांसाठी कमरेवर हात ठेवून तिष्ठत उभाच. त्याच्या पुढ्यात आलेल्या पैशांकडे तो ढुंकूनही पहात नाही. त्याचे लक्ष भक्तांच्या प्रेमळ भावाकडे असते. त्याच्याजवळ पैसे नसल्याने रुक्मिणी देवीची फारच पंचाईत होते. माहेरून मिळालेल्या हिरेजडित मोत्यांच्या बांगड्या हातात असल्या तरी तिला काचेची बांगडी हवी असते. मग काय, रुक्मिणी देवी पंढरपुरात बाजारपेठेत जातात आणि कासाराकडून उधार तत्त्वावर चुडा भरून घेतात. पैसे नंतर देईन असे म्हणतात. यावरची ओवी अशी आहे-
‘पंढरपुरामंदी गल्लोगल्लीनं कासार । रुकमिनी घाली चुडा सव्वा म्हैन्याला उधार ?’ स्त्रियांचे निर्मळ मन यातून बोलके होते.
विश्वनाटकी घननीळ कान्हा हाच एकदा चुडीवाला झाला. मनभावन वेष घेऊन नटला आणि राधेच्या घरावरून जाताना त्याने मोठ्याने आरोळी दिली...‘चुडी ले लो’! हिंदीतले एक अप्रतिम भजन आहे. ‘श्याम चुडी बेचने आया’.. खांद्यावरती झोळी घेतली. त्यात बांगड्या भरल्या आणि राधेच्या गल्लीत जाऊन बांगड्या घ्या, बांगड्या घ्या म्हणून सर्वांचे चित्तहरण केले. गोपिका सगळ्या एकत्र राधेकडे जमल्या होत्या. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता कान्हाला घरात बोलवले. रंगीबेरंगी बांगड्या दाखवून हरी म्हणाला, कोणत्या रंगाच्या बांगड्या भरू तुला राधा? तेव्हा राधा म्हणाली, मला हिरवी, लाल, सोनेरी कुठलीच बांगडी नको. सगळे रंग नाकारल्यावर तिला विचारले, ‘अग मग तुझ्या आवडीचा रंग तरी सांग.’ त्यावर राधा म्हणते, ‘मोहे श्याम रंग हे भाया.’ मला कृष्णरंग आवडतो. राधेने आपला हात पुढे केला आणि खट्याळ कृष्ण तिच्या हातात बांगड्या भरू लागला. राधेने ओळखले की हा दुसरातिसरा कोणी नसून चित्तचोर कन्हैयाच आहे. ‘राधा कहने लगी तुम हो छलिया बडे..’ किती छळतोस रे ! तेव्हा श्रीरंगाने हळूच तिचा हात दाबला. मग काय, आधीच श्यामरंगात बुडालेली राधा कृष्णात विरघळून गेली. कृष्णाचे चुडीवाला रूप खरंच खूपच मनभावन आहे. स्त्रियांचा अत्यंत आवडता दागिना म्हणजे बांगड्या. हातांचे सौंदर्य खुलवणारी बांगडी, तिचा नाद, तिचा संग खूप काही शिकवून जातो एवढे मात्र निश्चित!
-स्नेहा शिनखेडे