शुभमन गिल मानांकनात अग्रस्थानी
वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीच्या ताज्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिलने 791 मानांकन गुणांसह आपले अग्रस्थान अधिक भक्कम केले आहे. तर चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत दमदार फलंदाजी करणारा विराट कोहली 747 मानांकन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
दुबईमध्ये नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाबरोबरच्या उपांत्य सामन्यात विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत आपल्या संघाच्या विजयामध्ये मोलाची कामगिरी केल्याने त्याची या सामन्यात सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये चार डावांत कोहलीने 72.33 धावांच्या सरासरीने 217 धावा जमविल्या आहेत. पाकविरुद्धच्या सामन्यात त्याने शतक तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अर्धशतक झळकविले.
आयसीसीच्या अष्टपैलु मानांकन यादीत अफगाणच्या अझमतुल्ला ओमरझाईने पहिले स्थान मिळविले आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत ओमरझाईने आपल्या कामगिरीत सातत्य राखत अग्रस्थान काबीज करताना आपल्याच देशाचा मोहम्मद नबीला दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. ओमरझाईने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात फलंदाजीत 67 धावा तर गोलंदाजीत 5 गडी बाद केले होते. या स्पर्धेत त्याने तीन डावांत 126 धावा जमविल्या तसेच त्याने 7 गडी बाद केले. भारताचा अष्टपैलु अक्षर पटेलने 194 मानांकन गुणांसह 13 व्या स्थानावर झेप घेतली आहे. न्यूझीलंडचा केन विलियमसन या मानांकन यादीत 29 व्या स्थानावर आहे. वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत न्यूझीलंडच्या मॅक हेन्रीने 649 मानांकन गुणांसह तिसरे स्थान मिळविले असून लंकेचा महेश तिक्ष्णा पहिल्या तर द. आफ्रिकेचा केशव महाराज दुसऱ्या स्थनावर आहे. भारताचा मोहम्मद शमी 11 व्या स्थानावर आहे.