शुभमन गिल, अलाना किंग फेब्रुवारीतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
वृत्तसंस्था/ दुबई
टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिल याला 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाजीत संपूर्ण महिनाभर केलेल्या असामान्य कामगिरीमुळे बुधवारी ‘आयसीसी’चा फेब्रुवारीतील सर्वोत्कष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सला मागे टाकत भारताच्या वरच्या फळीतील स्टारने हा पुरस्कार पटकावला आहे.
मागील महिन्याभरातील पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गिलने 94.19 च्या स्ट्राइक रेटने व 101.50 च्या सरासरीने 406 धावा केल्या. यामध्ये इंग्लंडविऊद्धच्या मालिकेतील 3-0 विजयाचा समावेश होता. सदर मालिकेत गिलने सलग तीन वेळा 50 पेक्षा जास्त धावसंख्या नोंदविली. त्याने नागपूरमध्ये आत्मविश्वासाने 87 धावांची खेळी केली आणि त्यानंतर कटकमध्ये 60 धावा केल्या, तर अहमदाबादमध्ये शानदार शैलीत शतक करताना केवळ 102 चेंडूंत 14 चौकार आणि तीन षटकारांसह 112 धावा केल्या. या खेळीमुळे गिलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही त्यालाच मिळाला.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही आपली चांगली कामगिरी चालू ठेवताना गिलने दुबईमध्ये बांगलादेशविऊद्धच्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात नाबाद 101 धावांची खेळी केली. त्यानंतर त्याने पाकिस्तानविऊद्ध 46 धावांची खेळी केली. या खेळींच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सुऊवातीचे दोन्ही सामने जिंकले. याआधी 2023 सालच्या जानेवारी आणि सप्टेंबरमध्ये दोनदा हा पुरस्कार त्याने जिंकलेला आहे.
दरम्यान, महिला विभागात अलाना किंग फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली आहे. तिने सहकारी अॅनाबेल सदरलँड आणि थायलंडच्या थिपत्चा पुथावाँगला मागे टाकले. यामुळे मागील सलग तीन महिने हा पुरस्कार ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडे गेला आहे. यापूर्वी सदरलँड (डिसेंबर 2024) आणि बेथ मुनी (जानेवारी 2025) यांना हा पुरस्कार मिळाला होता. किंग प्रथमच महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेली असून तिने याचे श्रेय सहकाऱ्यांना दिले आहे.