शुभम शेळके यांचा अन्नत्याग सत्याग्रह
काळ्यादिनी कारागृहातून नोंदवणार निषेध
त. भा. प्रतिनिधी / बेळगाव
म. ए. युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके व सरचिटणीस मनोहर हुंदरे हे सध्या हिंडलगा कारागृहात असल्याने त्यांना 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळ्यादिनाच्या फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही. परंतु जेथे आहे तेथे सीमाप्रश्नासाठी योगदान देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. रविवारी हिंडलगा कारागृहात एक दिवसीय अन्नत्याग सत्याग्रह करून सीमावासियांच्या भावना व्यक्त करणार आहेत.
मागील दहा ते बारा दिवसांपासून एका गुन्ह्यात शुभम शेळके व मनोहर हुंदरे हे हिंडलगा येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. सीमाभागातील मराठी माणूस आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात 1 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारचा निषेध करत काळादिन पाळतो. या काळ्यादिनाच्या फेरीच्या पार्श्वभूमीवर या दोघांनाही अटक करण्यात आल्याने सीमाभागात संताप व्यक्त केला जात आहे. माननीय न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्याने अजून त्यांची जामिनावर सुटका झाली नाही.
काळ्यादिनाच्या फेरीत प्रत्यक्ष सहभागी होता येणार नसले तरी हे दोघेही रविवारी कारागृहात एकदिवसीय अन्नत्याग सत्याग्रह करून सीमावासियांना पाठिंबा देणार असल्याचे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
