For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

शुभम शेळके यांच्यासह दोघांना अटक

11:41 AM Oct 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
शुभम शेळके यांच्यासह दोघांना अटक
Advertisement

खडेबाजार पोलिसांची कारवाई : अट्रोसिटीच्या गुन्ह्यात दीड वर्षांनंतर कारवाई

Advertisement

बेळगाव : अट्रोसिटीच्या दाखल गुन्ह्यात खडेबाजार पोलिसांनी म. ए. समितीचे युवानेते शुभम विक्रांत शेळके व त्यांचे सहकारी मनोहर आप्पाजी हुंदरे यांना अटक केली आहे. गुरुवार दि. 22 रोजी ही कारवाई करण्यात आली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर काळादिनाच्या तोंडावर पोलिसांनी केलेल्या या अटकेच्या कारवाईबद्दल मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अटकेची माहिती समजताच म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली होती. याप्रकरणी राजू लगमाप्पा तळवार रा. गणाचारी गल्ली यांनी वरील दोघांविरोधात  4 मार्च 2025 रोजी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला होता. 15 जानेवारी 2025 रोजी रामलिंगखिंड गल्ली येथील रंगुबाई पॅलेसनजीकच्या चहा दुकानानजीक म. ए. समितीच्या बैठकीबाबत मोठ्या आवाजाने बोलत होते. त्यावेळी फिर्यादी त्या ठिकाणी गेले व काय झाले? कशासाठी आवाज करत आहात? अशी विचारणा केली.

त्यावेळी शुभम शेळके आणि मनोहर हुंदरे यांनी तू येथे कशाला आलास? असे म्हणत जातीवाचक व अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली. दोघांनी मारहाणदेखील केल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला. याप्रकरणी दोन महिन्यांनंतर फिर्यादीने खडेबाजार पोलीस स्थानकात तक्रार दिली. मात्र या प्रकरणी संशयित शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांनी जामीन घेतला नाही. त्यामुळे न्यायालयाने दोघांविरोधात अटक वॉरंट जारी केले. त्यानुसार खडेबाजार पोलिसांनी गुरुवारी सकाळी दोघांच्याही घरी जाऊन कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले. त्यानंतर त्यांना पोलीस स्थानकात येण्याची सूचना केली. दोघेही कारमधून पोलीस स्थानकात दाखल झाले. पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णवर यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी दोघांचीही रवानगी कारागृहात करण्याचा आदेश बजावला. दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात मूक सायकलफेरीचे आयोजन केले जाते. त्यातच शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांना पोलिसांनी नियोजनबद्धरित्या अटक करून कारागृहात पाठविल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईबाबत मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.