कवलापूरात तंटामुक्ती अध्यक्षावर जिवघेणा हल्ला...जमावाकडून हल्ला करणाऱ्याचा खून
सहा जणांना अटक : एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल : लाथा-बुक्या, काठीने मारहाणीत मृत्यू
सांगली प्रतिनिधी
मिरज तालुक्यातील कवलापूर येथील तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्या संकेत उर्फ शुभम चन्नाप्पा नरळे वय 17 वर्ष, रा. कवलापूर, ता. मिरज याचा लाथा-बुक्क्याने काठीने मारहाण करून खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली. शुभम हा गंभीर जखमी झाल्यावर त्याला तात्काळ वसंतदादा सर्वोपचार रूग्णालय येथे दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी संशयित सहा जणांना सांगली ग्रामीण पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. त्याना न्यायालयाने 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कवलापूर येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांच्यावर मयत संकेत उर्फ शुभम चनाप्पा नरळे यांने त्याच्या अन्य दोन साथीदारासह कोयत्याने सोमवारी रात्री साडेसात ते पावणेआठच्या सुमारास कवलापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर हल्ला केला. यात भानुदास पाटील गंभीर जखमी झाले. त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्यांनी तात्काळ शुभमला पकडले आणि त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला. त्यानंतर पोलीस याठिकाणी आले आणि त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत असणाऱ्या शुभमला तात्काळ वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
तात्काळ सहा जणांना अटक
शुभमला गंभीर अवस्थेत पोलिसांनी वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची प्रकृतीची स्थिती पाहून मारहाण करणाऱ्या अनेक संशयितांना ताब्यात घेतले होते. मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाल्यानंतर शुभमचा भाऊ ओंकार चन्नाप्पा नरळे वय 19 र. हनुमान मंदिर साखर कारखान्यासमोर सांगली यांने आपल्या भावाला 15 जणांनी बेदम मारहाण केली असून त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची फिर्याद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. यानुसार गजानन तावदारकर, सचिन उर्फ पांडुरंग अरूण पाटील, दीपक मोनाप्पा पाटील, दीपक माळी, वैभव तोडकर, विशाल विलास पाटील सर्व. रा. कवलापूर, ता. मिरज याना अटक केली. तर याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले महेश मोहन पाटील, बंडा नाईक, पप्या मोनाप्पा पाटील यांच्यासह अन्य सहा जण बेपत्ता आहेत. याप्रकरणांचा तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश रामाघरे हे करत आहेत.
किरकोळ कारण ठरले जीवघेणे
शुभम याने वर्षा-दीड वर्षापुर्वी कवलापूर येथील एका शाळेत मुलींची छेड काढली होती. त्याची तक्रार मुख्याध्यपकांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांच्याकडे केली होती. भानुदास पाटील यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेवून शुभम याला समज दिली होती. त्यानंतरही शुभम हा सुधारला नाही. त्यांने पुन्हा छेड काढली त्यामुळे मुख्याध्यपकांनी त्याला शाळेतून काढून टाकले. भानुदास पाटील याच्यामुळेच मला शाळेतून काढून टाकले याचा राग शुभमच्या मनात ठासून भरला होता. त्यामुळे तो संधीची वाट पहात होता. दीड वर्षानंतर त्यांने या घटनेचा बदला घेण्यासाठी आपल्या अन्य दोन साथीदारासह कोयता हत्यार घेवून तो सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयसमोर भानुदास पाटील हे गप्पा मारत उभे होते. त्याठिकाणी आला आणि त्याने भानुदास पाटील यांना काही समजण्याच्या आधीच त्यांच्या डोक्यात शुभमने कोयत्याने हल्ला केला त्यावेळी भानुदास पाटील खाली पडले आणि ते ओरडले त्यावेळी जवळ असणाऱ्या नागरिकांनी तात्काळ शुभम आणि त्याच्या साथीदाराला पकडले त्यानंतर जखमी पाटील यांना सांगलीत भारती हॉस्पिटलसमोरील समर्थ हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले तर शुभम याला मारहाण सुरू करण्यात आली. यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला.
पोलीस ताफा कवलापूरात
भानुदास पाटील यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समजताच सांगली शहर पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरिक्षक सतीश शिंदे, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरिक्षक राजेश रामाघरे यांच्यासह मोठ्याप्रमाणात फौजफाटा याठिकाणी दाखल झाला. त्यांनी तात्काळ याठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला. तसेच संशयितांना ताब्यात घेतले. त्यामुळे गावात तात्काळ शांतता निर्माण झाली.
शुभमला पुन्हा मळ्यात नेवून मारहाण केली
शुभमला हल्ला करण्यात आलेल्या ग्रामपंचायत समोर संशयितांनी मारहाण केली. त्यानंतर पुन्हा तुकाई मळ्यात नेवून गंभीर दुखापत करणारी मारहाण केली असल्याची तक्रार त्याचा भाऊ ओंकार नरळे यांनी फिर्यादीत दिली आहे. पोलीस गाड्या गावात येत असल्याची माहिती समजताच संशयितांनी तात्काळ जखमी शुभम याला तुकाई मळा येथे उचलून नेले आणि त्याठिकाणीच त्याला जोरदार मारहाण केली आणि त्याला गंभीर अवस्थेत तिथे टाकून ते पळून गेले. त्यानंतर पोलीसांनी शुभमला वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात जखमी अवस्थेत दाखल केले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.