शुभांशू शुक्ला मे महिन्यात अंतराळ स्थानकात जाणार
40 वर्षांनंतर भारतीय अंतराळवीर घेणार झेप : 14 दिवस वास्तव्य
वृत्तसंस्था/फ्लोरिडा
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे मे महिन्यात अॅक्सिओम मिशन 4 अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत. या मोहिमेत चार देशांचे चार अंतराळवीर 14 दिवसांसाठी अंतराळ स्थानकात जातील. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने एका अपडेटमध्ये ही माहिती दिली. या मोहिमेचा मुख्य उद्देश अंतराळात वैज्ञानिक संशोधन, तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करणे आहे. हे अभियान अॅक्सिओम स्पेसच्या खासगी अंतराळ प्रवासाला प्रोत्साहन देण्याच्या आणि भविष्यात व्यावसायिक अंतराळ स्थानक (अॅक्सिओम स्टेशन) स्थापन करण्याच्या योजनांचा एक भाग आहे.
शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरतील. यापूर्वी राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळात प्रवास केला होता. नासा आणि इस्रो यांच्यातील करारानुसार, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. सध्या ते भारतीय हवाई दलात अधिकारी पदावर कार्यरत आहेत. हे अंतराळवीर एलोन मस्क यांच्या कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये उ•ाण करतील. हे अभियान फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून फाल्कन-9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले जाईल. अंतिम मंजुरी आणि मोहिमेच्या तयारीच्या आधारे प्रक्षेपण तारीख जाहीर केली जाणार आहे.
अॅक्सिओम-4 ही एक खासगी मोहीम
अॅक्सिओम मिशन 4 ही एक खासगी अंतराळ उ•ाण मोहीम आहे. हे अभियान अमेरिकेची खासगी अंतराळ कंपनी अॅक्सिओम स्पेस आणि नासा यांच्या सहकार्याने राबवले जात आहे. अॅक्सिओम स्पेसचे हे चौथे मिशन आहे. 17 दिवसांचे मिशन अॅक्सिओम 1 एप्रिल 2022 मध्ये लाँच करण्यात आले. अॅक्सिओमचे दुसरे मिशन 2 मे 2023 रोजी लाँच करण्यात आले. या मिशनमध्ये चार अंतराळवीरांनी आठ दिवस अंतराळात घालवले. तिसरे अभियान 3 जानेवारी 2024 रोजी झाले. त्यातील अंतराळवीरांनी 18 दिवस अंतराळात घालवले होते.