‘मिराय’ चित्रपटात श्रिया सरन
चित्रपटाचे पोस्टर निर्मात्यांकडून सादर
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया सरन आता ‘मिराय’ नावाच्या चित्रपटात दमदार भूमिका साकारताना दिसून येणार आहे. निर्मात्यांनी तिचा लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. श्रिया या पोस्टरमध्ये वेगळ्या शैलीत दिसून येत आहे. या चित्रपटात ती ‘अंबिका’ नावाची भूमिका साकारत आहे. प्रत्येक सुपरहीरोच्या प्रवासामागे एका आईची शक्ती लपलेली असते अशी कॅप्शन या पोस्टरसोबत जोडण्यात आली आहे.
मिराय हा चित्रपट एक सुपरहीरो, वॉरियरची कहाणी आहे. या सुपरहिरोला 9 पवित्रग्रंथांच्या सुरक्षेचे काम सोपविण्यात आले आहे. तसेच एक चमत्कारी दंड देखील त्याच्याकडे आहे. परंतु स्वत:च्या शक्तींची ओळख पटविण्यासाठी हीरोला कठोर प्रशिक्षणाला सामोरे जावे लागते. या कामात त्याला अनेक लोक मदत करतात. चित्रपटात तेज सज्जाने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तेजा सज्जा, श्रिया सरनसोबत मांचू मनोज, रितिका नायक, जयराम, जगपति बाबू, राजेंद्रनाथ जुत्शी, पवन चोप्रा आणि तन्जा केलर हे कलाकारही दिसून येणार आहेत. मिराय या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक गट्टमनेनी यांनी केले आहे. हा चित्रपट 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.