‘स्पेस जेन चंद्रयान’मध्ये श्रिया सरन
टीव्हीएफ स्वत:च्या ‘पंचायत’, ‘कोटा फॅक्ट्री’, ‘एस्पिरेंट्स’ समवेत अन्य लोकप्रिय वेबसीरिजसाठी ओळखले जाते. आता टीव्हीएफ एक नवी वेबसीरिज घेऊन येत असून यात भारताचा चंद्रापर्यंतचा प्रवास दाखविला जाणार आहे. या सीरिजचा टीझर जारी करण्यात आला असून यात श्रिया सरन, नकुल मेहता, प्रकाश बेलावाडी आणि सौरभ द्विवेदी हे प्रसिद्ध चेहरे दिसून येणार आहेत. जी गोष्ट कधीच कुणी पाहिली नाही, तिथपर्यंत मर्यादित साधनांसह पोहोचणे इस्रोपेक्षा चांगल्याप्रकारे कुणालाच जमत नाही असे याच्या टीझरमध्ये दाखविण्यात आले आहे.
या सीरिजमध्ये भारताच्या स्वप्नांना इतिहासात रुपांतरित करणाऱ्या वैज्ञानिकांची कहाणी आहे. या सीरिजचे दिग्दर्शन अनंत सिंहने केले आहे. तर निर्मिती अरुनभ कुमार यांनी केली आहे. शुभम शर्मा, प्रशांत कुमार आणि नितिन तिवारी यांनी या सीरिजची कहाणी लिहिली आहे. या सीरिजमध्ये श्रिया सरनसोबत अमृता खानविलकर ही मराठमोळी अभिनेत्रीही दिसून येणार आहे. या सीरिजचे सर्व एपिसोड्स 23 जानेवारीपासून हॉटस्टारवर पाहता येणार आहेत. श्रिया सरनचे चाहते तिला वेबसीरिजमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तर अमृताचा दमदार अभिनय या सीरिजमध्ये पाहता येईल अशी अपेक्षा व्यक्त होतेय.